येडगावच्या गणेश नगर येथे बंद घरे चोरट्यांनी फोडली. साडेतीन लाख रुपयांचा ऐवज केला लंपास.


विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

महाशिवरात्रीनिमित्त येडेश्वर मंदिर येडगाव येथे आयोजित हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनासाठी संपूर्ण कुटुंब घराबाहेर असताना चोरट्यांनी संधी साधत घरावर डल्ला टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. या घरफोडीत दत्तात्रय अशोक भिसे यांचे सुमारे पाच तोळे सोनं, राजेंद्र अशोक भिसे यांचे दहा हजार रुपये तसेच विजय अशोक भिसे यांचे पाच हजार रुपये असा एकूण मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीस गेला आहे. चोरट्यांनी घरातील कपाटे, साहित्य अस्ताव्यस्त करून मौल्यवान ऐवज लंपास केला. भिसे कुटुंबीय हे शेतकरी घराण्यातील असून मेहनतीच्या कष्टातून जमवलेली संपत्ती अशा प्रकारे चोरीला गेल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबीयांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी ही घरफोडी केल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन भिसे कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे करीत आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!