नारायणगाव : (प्रतिनिधी) वारूळवाडीच्या नंबरवाडी येथे शुक्रवारी (दि. 6) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार गारांचा वादळी पाऊस आल्याने व चक्री वादळ निर्माण झाल्याने काही क्षणात जगन्नाथ तुकाराम फुलसुंदर यांच्या राहत्यात घराचे पत्र्याचे छत उडून गेले. यामध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने मात्र कोणती दुर्घटना झाली नाही. याविषयी अधिक माहिती देताना जगन्नाथ फुलसुंदर म्हणाले की, शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदारपणे पाऊस सुरू झाला. घरामध्ये मी माझी पत्नी, मुलगा व सुनबाई होतो. गारा पडू लागल्याने आम्ही सगळे गारा गोळा करत असताना सोसाट्याचा जोरदार वारा आला जोरदार हवा घरात घुसल्याने घराचे पत्र्याचे छत उडाले व घराच्या पुढे असलेल्या आंब्याच्या झाडावर पडले. सुदैवाने हे पत्रे कोणाच्या अंगावर न पडल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान जगन्नाथ फुलसुंदर यांचे कुटुंब गरीब असून त्यांच्या घराचे छत उडाल्याने सुमारे तीन लाख रुपयाहून अधिकचे नुकसान झाले आहे. त्यांनी वादळी वाऱ्याने पत्रे उडू नये म्हणून या पत्र्यांवर मोठमोठे दगडी ठेवले होते. परंतु सोसाट्याचा वारा आल्याने पत्र्याचे छत उडाले पत्र्यावर ठेवलेले दगड घरातील भांड्यांवर पडले त्यामुळे भांड्यांचे देखील नुकसान झाले आहे. तसेच पावसाने धान्य देखील भिजले आहे. पाण्याच्या फिल्टरवर मोठा दगड पडल्याने हा फिल्टर पूर्णपणे निकामी झाला आहे. दरम्यान फुलसुंदर कुटुंब गरीब असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून या कुटुंबाला अर्थसहाय्य करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी केली आहे.