जुन्नर तालुक्यातील उंब्रज परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान.


नारायणगाव (प्रतिनिधी)जुन्नर तालुक्यामध्ये आज पुन्हा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्यांची तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. उंब्रज, खामुंडी, डिंगोरे, उदापूर या भागामध्ये दुपारी एक ते चारच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने टोमॅटो, हिरवी मिरची, तसेच काही लोकांचे कांदे देखील शेतामध्ये गरी लावून ठेवलेले कांदे देखील या पावसामुळे भिजले. उंब्रज क्रं. 1 परिसरात साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले. ऊस त्याचबरोबर टोमॅटो, केळी ही पिके अनेक ठिकाणी भुईसपाट झाली. तर काही शेतकऱ्यांची आंब्याची झाडं देखील उन्मळून पडली. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. घराचे पत्रे उडाल्याने अनेकांचे धान्य देखील या पावसामुळे भिजले आहे. उंब्रजच्या पाटील मळ्यातील बाळशीराम हांडे यांची आंब्याची झाडे या पावसाने पडली. तसेच गणेश विश्वास हांडे यांच्या घराचे पत्रे उडून गेले. अशोक हांडे यांची केळीची बाग या वादळी पावसाने भुईसपाट झाली. तसेच धनू हांडे यांचा वादळी पावसाने ऊस जमीन दोस्त झाला. दरम्यान गेल्या आठ दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने थैमान घातले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान काले परिसरामध्ये मागील आठवड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी आंबेगव्हाण परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे टोमॅटो पिक पाण्याखाली गेले होते तर काही लोकांचे कांदे देखील वाहून गेले आहेत. आज (दि.19) तालुक्याच्या विविध ठिकाणी दुपारी दोन नंतर जोराचा पाऊस झाला. या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले आहे. डिंगोरे येथील शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या बागा या पावसामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. शेतात पाणी साठल्याने टोमॅटोच्या मुळ्या सडून जाणार आहेत. तसेच टोमॅटो पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे. तसेच या भागामध्ये तरकारीची पिके देखील अधिक प्रमाणामध्ये घेतली जातात . फ्लॉवर आदी पिकांचं या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पाऊस पडत नसल्यावर आपण म्हणतो येरे येरे पावसा परंतु आता जारे जारे पावसा अशी म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर आल्याचे उंब्रज येथील अर्जुन हांडे यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!