विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
स्वर्गीय विठा भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जन्माने पुनित झालेल्या तमाशाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव नगरीमध्ये महाराष्ट्रातील विविध फड मालकांच्या 30 हून अधिक राहुट्या दाखल झाल्या असून यंदाच्या वर्षी फळ मालकांना सुगीचे दिवस असणार आहेत. तमाशाची बारी ठरवण्यासाठी महाराष्ट्रातील तमाशा प्रेमींची गर्दी वाढू लागली आहे.
ग्रामीण भागातील यात्रा जत्रांचा उत्सव सुरू होऊ लागल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही नारायणगावच्या या तमाशा नगरीत विविध फड मालकांनी आपली कार्यालये थाटली आहेत. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने या फड मालकांना जागा उपलब्ध करून दिली असून पिण्याच्या पाण्याची तसेच विज पुरवठा मिळवून देण्यास मदत केली आहे.मुक्ताई काळोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष खैरे व नारायणगाव ग्रामपंचायत उपसरपंच बाबू पाटे आदी मान्यवरांच्या उपस्थित या तमाशा नगरीत फड मालकांच्या कार्यालयांचा शुभारंभ करण्यात आला.
मालती इनामदार, काळू बाळू, विठा भाऊ मांग नारायणगावकर, भिका भीमा सांगवीकर, तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, मंगला बनसोडे, छाया खिलारे बारामतीकर, निलेश कुमार रूपाली पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, संध्या माने सोलापूरकर, दत्ता महाडिक पुणेकर, शिवकन्या बढे, दिपाली सुरेखा पुणेकर, अश्विनी पुणेकर, हिरामण ढवळपुरीकर आदी फड मालकांची या ठिकाणी या राहुट्या थाटल्या आहेत .
ग्रामीण भागातील लोककला जतन व्हावी व या कलेला वाव मिळावा यासाठी फड मालकाबरोबरच गावातील यात्रा जत्रा भरणारी गावची प्रमुख मंडळी यांचा मोठा वाटा राहत असतो. दरवर्षी आपल्या गावामध्ये तमाशाची बारी व्हायला हवी असा गावच्या यात्रा भरवणाऱ्या तमाशा प्रेमींचा असतो. पूर्वीचा तमाशा आणि सध्याचा तमाशा यामध्ये खूप मोठा बदल पाहायला मिळतो. पूर्वी तमाशाची बारी पहायला वाडी वस्तीवर राहणारे लोक ज्या गावात यात्रा आहे जेथे तमाशा आहे त्या ठिकाणी पायी जात असत. बारीतील ढोलकी, नाचणारी महिला यांच्या नादात डोक्यावरची पगडी व टोपी कधी पडून जायची हे कोणाच्या ध्यानात देखील येत नव्हते. त्यावेळी ऐतिहासिक वगनाट्य, पुराणिक कथांवर आधारित सादर केली जात होते .
दरम्यान गेल्या चार-पाच वर्षापासून ऐतिहासिक वगनाट्य, गण गौळण लयाला गेली असून उडत्या चालीची गाणी गायली जात आहेत. तरुणांची मागणी प्रामुख्याने चित्रपटातील गाण्यांना असल्यामुळे फड मालकांनी यामध्ये बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या महिला कलाकार अंगभर कपडे घालून लावणी अथवा गौळण सादर करीत होत्या. सध्या मात्र महिला कलाकार गौळण सादर करताना देखील आपऱ्या कापड्यांमध्येच पाहायला मिळतात. तमाशाच्या फडात तरुण मुली पाहिल्यावर मुलांच्या शिट्ट्या अधिक प्रमाणामध्ये ऐकायला मिळतात. सध्या मागणी तसा पुरवठा करावा लागतो. असे फड मालक सांगतात.
दरम्यान विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या तमाशा नगरीमध्ये तमाशाची बारी ठरवायला विविध गावच्या गाव पुढार्यांची गर्दी होऊ लागली आहे. मोठ्या फडमालकांची सुपारी दोन लाखाहून अधिकची असते. तर लहाण फड मालकांची सुपारी किमान एक लाख रुपये इतकी आकारली जाते. दोन लाखाहून अधिक सुपारी घेणारे फड मालक दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम देखील सादर करीत असतात. अधिकची महागाई,डिझेलचे वाढलेले दर तसेच कलाकारांना मोठ्या प्रमाणात उचल द्यावी लागत असल्यामुळे एक लाख रुपयांच्या आत मध्ये सुपारी परवडत नसल्याची खंत फड मालक मास्टर जगन कुमार वेळवंडकर यांनी व्यक्त केली. लहान फड मालकांना देखील हा यंदाचा तमाशाचा सिझन चांगला जाईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील पारंपरिक लोककला जतन करणे तेवढं सोपं राहिलेलं नाही. गायक व नाचणाऱ्या मुलींना लाखो रुपयांची उचल द्यावी लागते. त्यातच या कलाकारांची पळवा पळवी होते. पैसे बुडण्याची मोठी भीती असते. त्यामुळे फड मालकांना मोठी रिस्क घेऊन तमाशाचा ‘बाज’ टिकवावा लागत आहे. तमाशाचा तंबू, लाईट व्यवस्था, कलाकारांचा पगार त्यांच्या जेवणाची व्यवस्था हा सगळा खर्च लाखभर रुपयाच्या आसपास येतो. आणि तमाशाची सुपारी जर कमी मिळाली तर छोट्या फड मालकांना तोट्यात बारी करावी लागते. मोठे फड मालक मोठे होत जातात व लहान फड मालक अधिक लयाला जात असल्याची खंत फड मालक हौसाराणी पुणेकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान 19 मार्च रोजी पाडवा असल्यामुळे पाडव्याच्या दिवशी तमाशा पंढरीमध्ये बारी ठरवण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रामधून यात्रा प्रेमी व यात्रा कमिटी अध्यक्ष या तमाशा पंढरीमध्ये सुपारी देण्यासाठी येत असतात. या एकाच दिवसात करोडो रुपयांची उलाढाल होत असते. अक्षय तृतीयेपर्यंत फड मालकांच्या राहुट्या नारायणगाव येथे राहत असतात. यंदाच्या वर्षी कोणतीही निवडणूक नसल्यामुळे तमाशाच्या बारीला अधिकची मागणी राहील असे फड मालक सांगत आहेत.
तमाशाचा खेळ करण्याची वेळ शासनाने रात्री बारापर्यंत दिलेली आहे. त्यानंतर खेळ सुरू ठेवायचा असेल तर फड मालकांना पोलिसांना खुश ठेवावे लागते. यामध्ये फडमालकांची एनर्जी महाक वायाला जाते व आर्थिक नुकसान देखील होते. त्यामुळे शासनाने अधिकृतपणे पहाटे दोन वाजेपर्यंत तमाशाचा खेळ करण्यासाठी अतिकृत परवानगी द्यावी अशी मागणी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या फडाचे मालक मोहित नारायणगावकर यांनी केली आहे.