2027 च्या गळीत हंगामाला साखर कारखान्यांना उसाची कमतरता भासणार . ऊस लागवडीसाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्या लागणार.
नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा यंदाच्या वर्षी सर्वत्र उसाला तुरे आल्यामुळे उसाच्या वजनावर परिणाम होऊन सर्वच साखर कारखाने लवकर बंद झाले. तसेच लागवडीचे क्षेत्र कमी होऊ लागल्यामुळे साखर कारखान्यांची चिंता वाढलेली पाहायला मिळत आहे.पुढील सिझनचा गळीत हंगाम सुरू होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी असल्यामुळे या मधल्या गॅपमध्ये गळीत हंगामासाठी उसाच्या लागवडीसाठी खास प्रयत्न करावे लागणार आहेत. यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील बहुतांशी साखर कारखाने ऊस काळपाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकले नाहीत. उसाच्या पळवा पळवी बरोबरच उसाला तुरे जास्त आल्यामुळे आणि उसाचे वजन घटल्याने साखर कारखाने देखील लवकर बंद झाले आहेत . यंदाच्या वर्षी साखरेच्या उताऱ्यावर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरीत यंदाचा गळीत हंगाम साखर कारखानदारांबरोबरच ऊस उत्पादकांना देखील तोट्यात गेला आहे. तसेच यंदा जास्त पाऊस झाल्यामुळे सर्वत्र ऊसाला तुरे आले होते त्यामुळे उसाचे वजन घटले आहे. पुढील वर्षी सर्वच साखर कारखान्यांना उसाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासणार आहे.आडसाली व पूर्व हंगामी या उसाची देखील लागवड कमी झाले आहे. सध्या सुरू ऊस लागवडीचा हंगाम सुरू असला तरी उन्हाची तीव्रता असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड जरी केली तरी उसाच्या उगवणीवर उन्हाचा मोठा परिणाम होत असतो त्यामुळे सुरू उसाची देखील लागवड कमी होत आहे. खोडवा ऊस काढून टाकण्याचे प्रमाण शेतकरी वर्गाचे जास्त पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील हंगामासाठी उसाची कमतरता भरून काढण्यासाठी साखर कारखान्यांना ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्यासाठी विविध योजना जाहीर कराव्या लागण्याची शक्यता आहे. बहुतांशी साखर कारखाने आरसाली उसावर भर देत असतात. तसेच पूर्व हंगामी उसाची लागवड देखील अधिकची होत असते. त्यामानाने सुरू उसाची लागवड कमी होत असते. और सली ऊस लागवडीचा कालावधी जून ते ऑगस्ट असतो. व पूर्व हंगामी ऊस लागवडीचा कालावधी तीन महिन्याचा म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंतचा असतो. जानेवारीपासून सुरू उसाची लागवड सुरू होत असते. जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत सुरू उसाची लागवड होत असते त्यानंतर मात्र पाण्याची कमतरता व ऊसाला खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी सुरु ऊस लागवडीकडे काना डोळा करीत असतात. त्यामुळे बहुतांशी साखर कारखाने आडसाली व पूर्व हंगामी ऊस लागवडीकडे भर देत असतात. पुणे जिल्ह्यामध्ये खाजगी साखर कारखाने वाढल्यामुळे उसाची होणारी पळवा पळवापळव व कमी क्षेत्रात उसाची लागवड झाल्याने साखर कारखान्यांना ऊस लागवड प्रोग्राम मोठ्या प्रमाणात राबवावा लागणार आहे. दरम्यान ऊस लागवड क्षेत्र वाढवे म्हणून सर्व साखर कारखाने आडसाली उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी अनुदान तसेच आडसालीचे जास्त टनेज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस योजना राबवू शकतात. तसेच पूर्व हंगामी उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील साखर कारखाने बक्षीस योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर खोडवा उस ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीची योजना अथवा बक्षीस योजना राबवली जाऊ शकते. यंदाचा गळीत हंगाम बंद झाल्याचा व पुढील वर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या दरम्यानचा कालावधी खूप मोठा असल्याने साखर कारखाने केन डेव्हलपमेंट साठी वेगवेगळे फंडे राबवण्याची शक्यता अधिक आहे. शेतकऱ्यांचा पुन्हा ऊस लागवडीकडे कल वाढवण्यासाठी साखर कारखाने निश्चितच नवनवीन योजना जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबत विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, 2026 च्या गळीत हंगामामध्ये उसाचे एकरी उत्पादन अवघे 40 ते 42 मे. टन एकरी आल्याने गळीत हंगाम लवकर आटोपता घ्यावा लागला आहे. तसेच यंदाचे गळीत हंगामाचे ऊस गळपाचे उद्दिष्ट देखील सर्व साखर कारखाने पूर्ण करू शकले नाहीत. विघ्नहर कारखान्याची देखील तसेच परिस्थिती आहे.पुढील वर्षी देखील उसाची कमतरता भासणार असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड अधिकची करावी यासाठी शेतकी विभागाकडून विविध योजना राबवल्या जाणार असून आडसाली,पूर्वहंगामीव व सुरू उसाची लागवड जास्त होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच यंदा तुटलेल्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी राखावा यासाठी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना शेतकी विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत विनंती केली जाणार आहे. पुढील वर्षी उसाची लागवड जास्त व्हावी यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील असून शेतकऱ्यांसाठी अधिकच्या सवलती देण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे शेरकर यांनी सांगितले.