शिवसेनेची ६ जुलै रोजी आळेफाट्यात शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाची हाक.

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी आळेफाटा येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते आनंदभाऊ रासकर यांनी दिली आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी मंगळवार (दि. ३०) रोजी आळेफाटा येथील आर्यन हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शेतकरी सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करणे, शेतमालाला हमीभाव, सरसकट वीजबिल माफी, शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा तसेच स्मार्ट मीटरची जोडणी बंद करून आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून घेण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या बैठकीस उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, तालुका समन्वयक, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शहरप्रमुख, महानगर संघटक, महानगर समन्वयक, लोकप्रतिनिधी, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस वेळेत उपस्थित राहून नियोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन आनंदभाऊ रासकर यांनी केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!