जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मशाल, धनुष्यबाण, व तुतारी एकत्र येणार- देविदास दरेकर

नारायणगाव :(प्रतिनिधी)  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जुन्नर आंबेगाव व खेड तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तीन पक्ष एकत्र येऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांनी दिली.    ते म्हणाले देशात व राज्यातलं राजकारण आपण पाहतो सत्तेसाठी सगळी मंडळी एकत्र येतात. लोकसभा विधानसभाही नेत्यांची निवडणूक असते. राज्यात केंद्रात आम्ही जरी एकत्र सत्तेत असलो तरी आता कार्यकर्त्यांच्या हितासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर आघाडी करून धनुष्यबाण,मशाल व तुतारी असे एकत्र लढणार आहोत. याबाबतची आमची तयारी पूर्ण झाली असून कार्यकर्त्यांशी देखील बोलणे झाले आहे.     राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात आम्हा कार्यकर्त्यांचा कढीपत्त्यासारखा वापर चालवला आहे. विधानसभेला आम्ही त्यांच्या उमेदवारांना मदत केली परंतु निवडणूक झाल्यावर एकाही नेत्याने आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना कधी विश्वासात घेतले नाही व विकास कामाचे भूमिपूजन करताना सोबत घेतले नाही.     त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे तिघे आम्ही एकत्र येऊन जुन्नर आंबेगाव व खेड या तीन तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.   आम्ही तिघे एकत्र येणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रत्येक पक्ष आपापल्या चिन्हावर लढणार आहोत. ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेला मशालीचा उमेदवार उभा केला आणि खाली पंचायत समितीला एक तुतारीचा धनुष्यबाणाचा उमेदवार असला तरी त्या त्या पद्धतीने प्रचार करून आमच्या तिन्ही पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवारआम्ही विजयी करणार असल्याचा दावा दरेकर यांनी केला आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जागावाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.     राज्य व देश पातळीवर आमचे पक्षाचे नेते जरी महायुती सोबत असले तरी आम्हाला कार्यकर्त्यांसाठी अशा प्रकारचे नियोजन करावं लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर सुरुवातीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर नेत्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु या नेत्यांनी आम्हाला विश्वासात तर घेतले नाहीत शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आम्ही स्वतंत्र लढणार असे एकतर्फी जाहीर केल्यामुळे आम्हाला आता दुसरा पर्याय उरला नाही.  एकटे लढून निवडणुकीत धोका पत्करण्यापेक्षा जुन्या मित्रांना सोबत घेऊन जर निवडणुकीला सामोरे गेलो तर आपला विजय हमखास होईल असा कार्यकर्त्यांचा सूर असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही तिघे एकत्र आल्याचे दरेकर यांनी सांगितले.    जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा या संदर्भात आमची स्थानिक पातळीवर चर्चा झाली असून कार्यकर्त्यांनीही सोबत मशालीला व तुतरीला घ्यायला तयारी दर्शविली आहे. जुन्नरचे आमदार अपक्ष जरी असले तरी त्यांचे नाळ शिवसेनेची जुळलेली असल्यामुळे ते देखील आमच्या या आघाडीला साथ देतील याची आम्हाला खात्री आहे. तसेच खेड तालुक्यात सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे आमच्या सोबत राहून नव्याने स्थापन झालेल्या आघाडीला साथ देणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!