नारायणगाव : प्रतिनिधी
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात सभापती शिंदे पाटील यांच्या संयमी व समन्वयात्मक भाषणामुळे संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा आंदोलनस्थळी रंगली. आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही घटकांकडून आंदोलन भरकटण्याची चिन्हे दिसत असताना शिंदे पाटील यांनी शांततेचे आवाहन करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली.
आंदोलनादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना योग्य दिशा देत प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडण्यावर भर दिला. त्यामुळे उपस्थित शेतकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. काही काळ तणावाचे वातावरण असतानाही त्यांच्या भाषणानंतर आंदोलन अधिक संघटित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, कांद्याला हमीभाव मिळावा आणि बाजार समित्यांमधील अडचणी दूर कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिंदे पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलनाचा पुढील टप्पा शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचे उपस्थितांनी सांगितले.