मान्सून पूर्व पावसाने ओतूर परिसर पिकांचे मोठे नुकसान. पंचनामे करण्याची मागणी.

 नारायणगाव (प्रतिनिधी )जुन्नर तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांचे शेतमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाकडून यासंदर्भात दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याध्याक्ष प्रमोद पानसरे यांनी केली आहे.
  जुन्नर तालुक्यासह खेड आणि आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने तरकारी शेतमाल, मेथी, कोथिंबीर, चारापिके, कांदा, टोमॅटो, फुले, उन्हाळी बाजरीसह भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पश्चिम पट्ट्यात आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीने शेताचे बांध फुटून शेतातील माती सुध्दा वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरांमध्ये शिरून घरगुती वस्तूंचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी साठवलेला कांदा सुध्दा पाण्याच्या लोंढ्यांनी वाहून गेला आहे. 
    सदर उन्हाळी पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांनी आणि कंपन्यांकडून काढलेला नाही. त्यामुळे पीक विमा कंपन्यांकडून भरपाई मिळण्याची शक्यता नाही. तरी राज्य सरकारने यासंदर्भात गंभीर दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत. अगोदरच कुठल्याच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाहीत. उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विम्याचे पैसे सुध्दा अद्याप पर्यंत मिळालेले नाहीत. तरी सरकारने अडचणीत सापडलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रमोद पानसरे यांनी केली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!