जुन्नर तालुक्यात आवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. गारपिटीचा तडाखा.


नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वडज, निमदरी, तेजेवाडी, शिरोली बुद्रुक परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. काही भागांत गारपीटही झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अंदाजे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. निमदरी व धोंडकरवाडी परिसरात जोरदार वारा, पाऊस व गारपीट यामुळे कांदा, गहू, बाजरी, टोमॅटो, आंबा तसेच फुल पिके आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या आवकाळी पावसामुळे काढणीसाठी तयार असलेला गहू भिजून खराब झाला. तसेच सध्या कांदा काढणे सुरू असून अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतामध्येच भिजला आहे तर काही शेतकऱ्यांनी प्लास्टिक कागद टाकून कांदा झाकून ठेवला. गारपीटीमुळे टोमॅटो फळांची नासधूस झाली. कांद्याचे पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करत तातडीने ताडपत्री घालावी लागली. याशिवाय अवकाळी पावसाचा फटका वीट भट्ट्यांनाही बसला असून त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वीट भट्टी परिसरामध्ये पाण्याचे तळे साचल्याने नव्याने तयार केलेल्या सगळ्या विटांचा गाळ झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया : “आमचा कांदा पूर्णपणे भिजला असून साठवणूक करणे अवघड झाले आहे. मोठा खर्च करून पिक घेतले, पण अवकाळी पावसाने सर्व मेहनत वाया गेली असल्याचे निमदरीचे महेंद्र धोंडकर यांनी सांगितले. “गहू काढणीसाठी तयार होता, पण अचानक आलेल्या पावसामुळे तो भिजून खराब झाला. आता हातात काहीच उरणार नाही, आंबा पिकाचे देखील नुकसान झाले असून वीट भट्टी व्यवसायिकांना या वादळी पावसाचा मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे राजू चव्हाण व संतोष वाघ यांनी सांगितले. पंचनाम्याची मागणी या पार्श्वभूमीवर शिवनेरी शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढोमसे यांनी महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले असून शासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!