जीएमआरटीमुळे रेल्वे मार्ग बदलू नका; अन्यथा ‘दुर्बीण प्रकल्प हटाव’ आंदोलनाचा इशारा ९ ऑगस्टला नारायणगावात पुणे–नाशिक महामार्गावर रास्ता रोको

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा पुणे –नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट २०२६ (क्रांती दिन) रोजी सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली. खोडद येथील जीएमआरटी दुर्बीण प्रकल्पाच्या तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून केंद्र शासन रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय घेत असेल, तर जुन्नर तालुक्याच्या विकासात अडथळा ठरलेल्या जीएमआरटी दुर्बीण प्रकल्प हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. नारायणगाव येथील मुक्ताबाई समाज मंदिरात नारायणगाव ग्रामपंचायत उपसरपंच बाबू पाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला बाळासाहेब पाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित बेनके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खैरे, भाजपा मंडल अध्यक्ष आशीष माळवदकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, अरिफ आतार, रामदास अभंग यांच्यासह जुन्नर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच खोडद, मांजरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित बेनके म्हणाले, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे–चाकण–राजगुरूनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–सिन्नर या मूळ मार्गानेच पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प होणे अत्यावश्यक आहे. या प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी पूर्ण झाली होती आणि भूसंपादन प्रक्रियेलाही सुरुवात झाली होती. मात्र, खोडद येथील दुर्बीण प्रकल्पाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून रेल्वेचा मूळ मार्ग बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. जर दुर्बीण प्रकल्पामुळे रेल्वे प्रकल्पासह या भागाच्या विकासालाच अडथळा निर्माण होत असेल, तर जीएमआरटी दुर्बीण प्रकल्प हटाव मोहीम सुरू करण्यात येईल. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष योगेश पाटे म्हणाले, जुन्नर तालुका हा कृषीप्रधान असून जीएमआरटी दुर्बीण प्रकल्पामुळे उद्योग-व्यवसायाच्या वाढीवर मर्यादा आल्या आहेत. विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, उद्योजक आणि व्यापारी यांच्या भविष्यासाठी पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प मूळ मार्गानेच होणे गरजेचे आहे. या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले असून कोणत्याही परिस्थितीत रेल्वेच्या मूळ मार्गात बदल होऊ दिला जाणार नाही. अन्यथा जीएमआरटी प्रकल्प हटाव आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी संतोष खैरे, माऊली खंडागळे, आशीष माळवदकर, डॉ. प्रशांत काचळे आदींनीही आपली मनोगते व्यक्त करून मूळ रेल्वे मार्ग कायम ठेवण्याची जोरदार मागणी केली.

जाहिरात

error: Content is protected !!