नारायणगाव :(प्रतिनिधी) पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव ते आळेफाटा बायपास रस्ता दरम्यान रस्त्याला खूप खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मोठे धरून वाहने चालवावी लागत आहेत. अनेकदा मागणी करून देखील संबंधित विभाग खड्डे बुजवत नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.खा. अमोल कोल्हे यांनी तात्काळ लक्ष घालावे व रस्त्याचे खड्डे बुजवन्याचे संबंधिताने आदेश द्यावेत अशी मागणी केली जात आहे. पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगाव पासून तर आळे फाट्यापर्यत रस्त्याला अनेक ठिकाणी खूप खड्डे पडले आहेत.प्रामुख्याने शाम्पेन कंपनी पासून बढे कला केंद्रापर्यंत जास्त खड्डे पडलेले आहेत.पावसाळा उघडल्यावर खड्डे बुजवले जातील असे संबंधित विभाग सांगत होता परंतु आता पाऊस उघडून एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे तरी देखील संबंधित विभागाला खड्डे पुजवायला वेळ मिळत नसल्याची खंत वाहन चालकाकडून व्यक्त केली जात आहे.राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पुणे नाशिक महामार्गने प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहन चालकाकडून चाळकवाडी टोल नाक्यावर टोल आकारला जातो परंतु रस्त्याचे खड्डे मात्र बुजवले जात नाहीत. “तुम्हाला रस्ता नीट करता येत नाही तर टोल कशाला घेता?” असा सवाल वाहन चालक व्यक्त करीत आहेत. केवळ रस्त्याला खड्डेच पडलेत असं नाही तर रस्त्याच्या साईड पट्ट्या देखील पूर्णपणे खराब झालेले आहेत.बाजूचे जोड रस्ते देखील खूप खराब झाले आहेत.राष्ट्रीय महामार्गाने रस्त्याच्या डागडूजीसाठी व खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्ती केलेली आहे परंतु ही एजन्सी खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार केली जात आहे. दरम्यान या संदर्भात शिरूर विभागाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, या रस्त्याला खड्डे खूप पडले आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. संबंधित अधिकाऱ्यांना हे खड्डे तात्काळ बुजवा अशा सूचना दोन वेळेला दिलेल्या आहेत. परंतु हे मुजोर अधिकारी जर खड्डे बुजवत नसतील तर मग मात्र वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा खासदार कोल्हे यांनी दिला आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता दिलीप शिंदे यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, या रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित ठेकेदाराला तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत.येत्या आठ दिवसांमध्ये नारायणगाव ते आळेफाटा दरम्यान रस्त्याला असलेले सगळे खड्डे बुजवले जातील.
मनसेचे उपजिल्हाप्रमुख मकरंद पाटे म्हणाले की, या रस्त्याला खूप दिवसापासून खड्डे पडले आहेत त्याचबरोबर उप रस्ते देखील पूर्णपणे खराब झालेले आहेत अनेकदा अधिकाऱ्यांना सांगूनही जर दखल घेतली जात नसेल तर मनसेला आपल्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल. व या रस्त्यात असलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा व ठेकेदाराचा त्याचबरोबर या खात्याच्या मंत्री महोदयांचा निषेध करावा लागेल असा इशारा पाटे यांनी दिला आहे.