कालवा फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईशिवाय पाणी सोडू देणार नाही : अतुल बेनके


नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिल्याशिवाय तसेच इतर ठिकाणच्या कालव्यांची दुरुस्ती केल्याशिवाय कुकडी प्रकल्पातून पूर्व भागातील तालुक्यांसाठी पाण्याचा एकही थेंब जाऊ देणार नाही, असा इशारा जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. कालवा फुटून बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी बेनके यांनी घटनास्थळी जाऊन केली. पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटल्याने सुनील बबन निमसे व संतोष बबन निमसे या शेतकऱ्यांची सुमारे चार ते पाच एकर जमीन वाहून गेली. संबंधित शेतकऱ्यांनी जमीन सपाटीकरणासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च केला होता. मात्र कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात माती वाहून गेली असून शेतीचे नुकसान झाले आहे. याशिवाय पंकज भाऊसाहेब हांडे व शेखर भाऊसाहेब हांडे यांच्या शेतातील बाजरी, ऊस व कोथिंबीर पिकांचेही नुकसान झाले. कालव्याच्या पाण्याखाली माती सरकून पिके गाडली गेली आहेत. ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष निमसे हे कोथिंबिरीला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना कालव्याजवळ मोठा खड्डा दिसून आला. पुढे जाऊन पाहणी केली असता कालव्याला भगदाड पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पिंपळगाव जोगा धरण गाठून वॉचमनच्या मदतीने कालव्याचा ढापा बंद केला. धरणापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर हा कालवा फुटला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही छोटे भगदाड पडले होते. त्याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली होती. मात्र वेळेत दुरुस्ती न झाल्याने मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच ज्या ठिकाणी भगदाड पडले त्या परिसरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत कालवा कधीही फुटू शकतो, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी आमदार अतुल बेनके यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला. संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन त्यांच्या जमिनीचे सपाटीकरण प्रथम करण्यात यावे. त्यानंतर कालव्याची इतर ठिकाणची दुरुस्ती करूनच फुटलेल्या भागातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा कुकडी प्रकल्पातून पूर्व भागातील तालुक्यांकडे पाणी जाऊ देणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोनाबाई दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, बबनराव तांबे, सीतेवाडीचे माजी उपसरपंच विकास राऊत यांच्यासह पंकज हांडे, नवनाथ सुकाळे, जितू सस्ते, अमोल चौधरी, सुनील निमसे, राजू गाडगे, संदीप सस्ते, विशाल गाडगे, निलेश हांडे, भगवान हांडे आदी शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

error: Content is protected !!