नारायणगाव : अमेरिका-इराण- इस्राईल युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेमुळे जुन्नर तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर रविवारी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी वाहनांच्या रांगा लावून इंधन भरण्यासाठी धाव घेतल्याने काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही ग्राहकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सकाळपासूनच पेट्रोल संपणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यामुळे खबरदारी म्हणून टाकी फुल करून घेतली.” तर एका अन्य ग्राहकाने सांगितले, “सोशल मीडियावर संदेश पाहून आम्हीही इंधन भरून घेतले, नंतर कळले की ही फक्त अफवा आहे.” दरम्यान, प्रशासनाच्या वतीने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जुन्नर- आंबेगावचेचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे म्हणाले की, “जुन्नर तालुक्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कुणीही पेट्रोल डिझेलचा साठा करू नये.त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे.” प्रशासनाने नागरिकांना अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आवाहन करत अफवांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.