नारायणगाव : (प्रतिनिधी)श्री क्षेत्र ओझर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवार दुपारी साडेबारा वाजता फुलांचा वर्षाव करून मोरया गोसावींची पदे म्हणत भक्तीमय वातावरणात श्री विघ्नहाराचा जन्मोत्सव सोहळा साजराकरण्यात आला. या निमित्त विघ्नहर मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, विश्वस्त विनायक मांडे, संतोष कवडे, शिल्पा जगदाळे व ग्रामस्थांच्या हस्ते पहाटे ४.३० वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी ७.३० वा. गणेशभक्त तुषार कवडे,अनिकेत बोडके,दीपक गवळी,विलास कवडे ,अमोल ढवळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सकाळी ९ ते १२ या वेळेत अंबेराई ओझर (जगदाळे मळा) येथे पृथ्वी- सूर्य पूजा करून चौथा उत्तरद्वार संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात श्री क्षेत्र ओझर येथील श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ व श्री विठ्ठल प्रसार्दिक भजन मंडळ सहभागी झाले होते. स्थानिक ग्रामस्थांनी फुलांची उधळण करुन पालखीचे स्वागत केले. पालखी मंदिरात परतल्यानंतर ग्रामस्थ, देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी, विघ्नराजेंद्र जोशी, जयेश जोशी, अमय मुंगळे त्यांनी मोरया गोसावी पदांचे गायन केले. कीर्तनकार ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज मोरे देहू यांचे देवजन्माचे कीर्तन झाले. गणेश भक्तांच्या प्रचंड गर्दीने व श्रींच्या नामघोषामुळे मंदिर गाभारा, आवार आणि परिसरतील वातावरण मंगलमय झाले होते. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विक्रम कवडे, समीर मांडे, विनायक मांडे, संतोष कवडे, विलास कवडे, मंगेश पोखरकर, विनायक जाधव, शिल्पा जगदाळे यांनी सोहळ्याचे उत्तम नियोजन केले होते.