नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, ओझर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १४ सामूहिक विवाह सोहळ्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. धार्मिक वातावरण, पारंपरिक विधी आणि सामाजिक संदेशांनी सजलेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता गणेश पूजनाने झाली. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, सूर्यकांत रवळे, विनायक मांडे, समीर मांडे, विलास कवडे, विनायक जाधव, सौ. शिल्पा जगदाळे, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष संतोष मांडे, पोलिस पाटील मोहन कवडे, प्रिती कवडे, तंटामुक्ती अध्यक्ष चिंतामण कवडे तसेच ग्रामस्थ रघुनाथ कवडे, किसन मांडे आदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यानंतर सुपारी फोडणे, साखरपुडा व टिळा समारंभाचा संगीतमय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी वधू-वरांना ‘स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही व करून देणार नाही’ अशी शपथ देण्यात आली. महाराष्ट्र गीताने टिळा-साखरपुडा कार्यक्रमाची सांगता झाली. सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत वऱ्हाडी मंडळींसाठी विशेष भोजन मंडपात रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. RO प्लांटचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, स्वतंत्र निवास व्यवस्था तसेच वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वधू-वरांसाठी हार, गुच्छ, बाशिंगे, कळसतांब्या, हळद साहित्य, मामांचे फेटे, सुवासिनी सत्कार, नवरदेवांचे टोप, अक्षदा, कन्यादान विधी यांसह विविध आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या. दुपारी ३ वाजता सनईच्या मंगल स्वरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ३.४५ वाजता वधू-वरांचे व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, विश्वस्त सूर्यकांत रवळे व ओझर गावचे माजी सरपंच जगन्नाथ कवडे यांनी नवदांपत्यांना शुभाशिर्वाद दिले. या सोहळ्यास ग्रामविकास मंडळ अध्यक्ष संतोष मांडे, तंटामुक्ती अध्यक्ष चिंतामण कवडे, पोलिस पाटील मोहन कवडे, प्रिती कवडे, देवस्थानचे माजी अध्यक्ष उद्योजक बी. व्ही. मांडे, माजी सरपंच किसन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक अशोक घेगडे यांनी केले. तर कुलस्वामिनी पारवे यांनी मंगलाष्टकाचे गायन करून विवाह सोहळा संपन्न केला.