
ओतूर ( प्रमोद पानसरे ) अक्षय तृतीयाला, 30 एप्रिल 2025 रोजी ओतूर ( ता. जुन्नर ) येथे देहू संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या शुभहस्ते त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सांगता सोहळ्याचे धर्म ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांनी दिली आहे.
छोटे माऊली आणि ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर येथील त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सांगता सोहळ्याची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओतूर गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय, धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक, तसेच इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सदर सोहळ्या निमित्त 17 मे 2025 रोजी ओतूर येथे होणाऱ्या भव्यदिव्य मिरवणूकीचे नियोजन करण्यात आले. कमीट्या स्थापन करून अनेकांना जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. तसेच संपूर्ण त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने होणार असलेल्या विविध उपक्रमांबाबत नियोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध प्रमुख संस्थानिकांची कीर्तनसेवा, तुकाराम महाराजांची सुश्राव्य कथा, संगीत गाथा पारायण, 24 तास “राम कृष्ण हरि” मंत्राचा जप, अखंड हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबीर, कृषी प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन व विक्री, आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर नेत्रदीपक भव्यदिव्य त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सांगता सोहळ्यासाठी संपूर्ण जुन्नर तालुक्यासह, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर, आकोलेसह संगमनेर तालुके आणि मुंबईकर, पुणेकर रहिवाशी, तसेच देहू संस्थान सहकार्य करणार आहेत. अशी माहिती ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ) यांनी दिली आहे.
