नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या तातडीने प्रसिद्ध करण्याचे आदेश संबंधित विभागाने दिले आहेत. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालये, सहकारी संस्था व बँक शाखांमध्ये या याद्या आजच प्रसिद्ध करून त्याबाबतचा अहवाल विभागीय कार्यालयाकडे त्वरित सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र थकबाकीदार सभासदांनी जवळच्या सुविधा केंद्रावर जाऊन आवश्यक प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार आधार प्रमाणीकरण तसेच तक्रार नोंदणीची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत असून, कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याची माहिती तात्काळ वरिष्ठ कार्यालयाला कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काही सेवा केंद्रांकडून आधार प्रमाणीकरण व तक्रार नोंदणीसाठी प्रति सभासद १०० रुपये बेकायदेशीररीत्या आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून शुल्क वसूल करणाऱ्या सेवा केंद्र चालकांवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व सुविधा केंद्रांवर “ही सेवा पूर्णपणे मोफत आहे” असे फलक लावण्याचे निर्देश देऊन शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची खात्री करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.