नारायणगाव:(प्रतिनिधी) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवृत्ती काळे यांची आज (दि. 9) झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत करण्यात आल्याची माहिती सचिव रुपेश कवडे यांनी दिली.
ते म्हणाले की बाजार समितीच्या संचालक मंडळाची आज मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रीतम काळे यांनी मागील महिन्यामध्ये उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. आजच्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीमध्ये एकमेव निवृत्ती काळे यांचा उपसभापती पदासाठी अर्ज आल्याने त्यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रकाश ताजने यांनी निवृत्ती काळे यांचे उपसभापती पदासाठी नाव सुचवले तर नबाजी घाडगे या संचालकांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित सर्व संचालक मंडळांनी या निवडीबद्दल टाळ्या वाजवून निवृत्ती काळे यांचे अभिनंदन केले.
बाजार समितीचे सभापती संजय काळे व सर्व संचालक मंडळ यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला उपसभापती पदाची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांचे मनापासून आभार मानतो, असे उपसभापती झाल्यावर निवृत्ती काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचा नेहमीच विचार करत आलेली आहे व यापुढे देखील शेतकरी हिताचा विचार सभापती संजय काळे उपसभापती मी आमचा संचालक मंडळ करत राहील. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिकाधिक बाजारभाव मिळवून देण्यासाठी व त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे काळे यांनी सांगितले.