नारायणगाव : ( प्रतिनिधी )
निमगाव सावा (तालुका जुन्नर ) येथे एका शेतकऱ्याच्या शेतावर मुक्कामी असलेल्या मेंढपाळाच्या कुटुंबावर बिबट्याने हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केले. जखमींना मंचर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंकुश लक्ष्मण बिचुकले त्याची पत्नी मीरा अंकुश बिचुकले व वडील लक्ष्मण बीचुकले हे तिघे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले. सोमवारी (दि. 19) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबतची समजलेली माहिती अशी की, निमगाव सावा येथील घोडेमळाच्या आंबा पट्टी परिसरात जिजाभाऊ थोरात यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा बसवण्यात आला होता. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने मेंढरांवर हल्ला करायचा प्रयत्न केला. मेंढरांच्या आवाजाने अंकुश जागा झाला त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर झडप घातली हे पाहून त्याची पत्नी मीरा त्याला वाचवायला धावल्या तर बिबट्याने तिच्यावर देखील हल्ला केला. ह्या दोघांच्या मदतीला वडील लक्ष्मण बिचुकले धावले.बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केले. व बिबट्या पळून गेला.
दरम्यान बिबट्याने हल्ल्याने तिघेही घाबरून गेले. तिघांचा आरडाओरडा ऐकून संदीप थोरात व मळ्यातील तरुण घटनास्थळी पळत आले. बिबट्याने तिघांनाही चावा घेतल्याने जखमेतून रक्त वाहत होते. त्यामुळे त्यांना तातडीने निमगाव सावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलविले.प्राथमिक उपचार करून त्या तिघांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु बिबट्याने हल्ला केलेल्या जखमेमधून जास्त रक्तस्त्राव असल्याने व तो थांबत नसल्याने या तिघांना पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान निमगाव परिसरामध्ये बिबट्यांची संख्या वाढली असून वनविभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरे लावावेत व बिबट्याच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल असा इशारा संदीप थोरात यांनी दिला आहे.