
नारायणगाव : (प्रतिनिधी) नारायणगाव येथील पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वात मोठी असलेल्या मुक्ताबाई काळोबा यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून यात्रेला लाखो लोकांची उपस्थिती लावत आहे. घागर व पालखी मिरवणूक अतिशय शांततेत पार पडली. चार दिवस सुरू असलेल्या यात्रेत बारा ते पंधरा कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबू पाटे यांनी दिली. नारायणगावच्या यात्रेचा आजचा (दि. 26 )तिसरा दिवस असून आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे देवीस व काळोबा देवास मांडवडाळे,चोळी पातळ व देवी शेरनी नैवेद्य, रात्री छबिना मिरवणूक व त्यानंतर शोभेची दारूकाम असे भरगच्च कार्यक्रम आहेत.
दोन दिवसांमध्ये परिसरातील हजारो यात्रेकरूंनी व भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. यात्रेत असलेले मोठमोठे पाळणे, तसेच खाऊ गल्ली विविध प्रकारची असलेले खेळणी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच खवई गल्लीचे देखील चांगले नियोजन केले असल्यामुळे अनेक जण या ठिकाणी विविध पदार्थांवर ताव मारीत आहेत. नारायणगावची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रमध्ये प्रसिद्ध असून जागृत देवस्थान असल्याने नारायणगाव शहराबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. येथील पालखी मिरवणूक व घागर मिरवणूक हा कार्यक्रम विशेष आकर्षित ठरत असतो. गावातील महिला डोक्यावर घागर घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. विशेष म्हणजे काही महिला देखील ढोल वाजवीत असतात.शुक्रवारी (ता. 25)चार तास घागरींची मिरवणूक चालली. अतिशय शिस्तबद्ध ही मिरवणूक पाहायला मिळत असते.ढोल ताशांच्या गजरात व सर्वांचा सहभाग असलेली ही यात्रा आगळीवेगळी ठरत आहे. रविवारी(दि. 27) रोजी कुस्त्यांचा आखाडा भरणार असून महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या आखाड्यामध्ये सहभागी होणार आहेत. रात्री नऊ वाजेपर्यंत हा आखाडा चालू राहील अशी माहिती मुक्ताई सभागृह ट्रस्टचे अध्यक्ष संतोष खैरे यांनी दिली. ते म्हणाले यंदाच्या वर्षी यात्रा कमिटीला अध्यक्ष नियुक्त केला नसल्याने सर्वच कार्यकर्ते एक जीवाने काम करीत आहेत. मंदिराभोवती केलेली विद्युत रोषणाई सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे
यात्रेमध्ये कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबतची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. यात्रा उत्सवाच्या सुरक्षतेसाठी 65 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला असून यामध्ये 4 अधिकारी तसेच 17 महिलाकर्मचारी यांचा समावेश आहे. मुक्ताबाई देवीच्या अंगावर सोन्याचे व चांदीचे दागिने असल्यामुळे मंदिरात देखील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी पाळणे व इतर खेळणी आहेत त्या गर्दीच्या ठिकाणी ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्त असून सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
यात्राकरू व यात्राप्रेमी यांनी यात्रेमध्ये यात्रेचा आनंद घ्या परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबतची खबरदारी घ्या. जर कुणी चुकीचं वागलं तर कोणाचीही गय केली जाणार नाही. भाविकांनी आपले दागिने व पैसे काळजीपूर्वक संभाळावेत कायदा सुव्यवस्थेला कुठे तडा जाऊ देऊ नका,व्यवस्थापनाला सहकार्य करा असे आवाहन मुक्ताबाई काळोबा देवस्थानचे अध्यक्ष बाबू पाटे यांनी केले आहे. विशेष म्हणजे 24 एप्रिल ते 1 मे दरम्यान दररोज रात्री मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे. यावेळी सुद्धा तमाशा शौकिनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान यात्रेमध्ये कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये पोलिसांना सहकार्य करावे. यात्रेत आलेल्या लोकांना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांबरोबर संपर्क साधावा,असे आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे.
