नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शहाबान आजाद अन्सारी (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला हा आरोपी २४ सप्टेंबर रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात हजर झाला.
अन्सारी याच्याविरुद्ध नारायणगाव पोलिस ठाण्यात २०२३ व २०२४ मध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार एक शारीरिक दुखापतीचा, तर दोन मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता पोलिसांच्या निदर्शनास आली होती.
त्यामुळे त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करून जुन्नर–आंबेगाव उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत पुणे ग्रामीणच्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. प्रस्तावाची चौकशी व उपलब्ध अभिलेखांची पडताळणी केल्यानंतर २१ सप्टेंबर २०२६ रोजी एक वर्षाच्या कालावधीसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला.
त्यानुसार अन्सारी याने २४ सप्टेंबर २०२६ रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात हजर राहून, त्याला संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अहिल्यानगर जिल्ह्यात सोडण्यात आले. तडीपारीचा कालावधी २४ सप्टेंबर २०२६ ते २३ सप्टेंबर २०२७ असा आहे.
तडीपारीच्या आदेशातील कालावधीत तसेच प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश न करण्याच्या सूचना संबंधितास देण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन करून तो प्रतिबंधित क्षेत्रात आढळल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नारायणगाव पोलिसांकडून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सातत्याने प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. यापूर्वीही नारायणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सपांगे, पोलिस उपनिरीक्षक जगदीश पाटील तसेच पोलिस कर्मचारी सुभाष थोरात व सत्यरम केळकर यांनी केली.