गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सात गावांत नारायणगाव पोलिसांचा रूट मार्च.

नारायणगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी शनिवारी (दि. १२) नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात गावांत रूट मार्च काढला. वडगाव, कांदळी, निमगाव सावा, खोडद, शिरोली, सुलतानपूर आणि मांजरवाडी या गावांमध्ये पोलिसांनी संचलन करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला. गणेशोत्सव हा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संवेदनशील ठिकाणे, मुख्य रस्ते तसेच गर्दीच्या परिसरात पोलिसांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. रूट मार्चमध्ये तीन पोलीस अधिकारी, १५ पोलीस अंमलदार आणि २५ होमगार्ड सहभागी झाले होते. या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना गणेशोत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे आवाहन केले. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांमधील सलोखा कायम राहावा, तसेच गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून विशेष दखल घेतली जात आहे. नागरिकांनी अफवा अथवा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संदेशांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!