दुचाकीवरून आले अन् मंगळसूत्र हिसकावून पसार झाले ; नारायणगावात खळबळ.


नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यालगत मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसका मारून लांबवले. या घटनेत हिसका मारल्याने महिला जमिनीवर पडून किरकोळ जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
पुष्पलता निवृत्ती भोर (वय ५७, रा. शुभलक्ष्मी सोसायटी, शेटे मळा, नारायणगाव) या मॉर्निंगवॉकसाठी पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्यालगतून जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर हिसका मारला. यामुळे मंगळसूत्र तुटून पुष्पलता भोर जमिनीवर पडल्या. त्यांना किरकोळ दुखापत झाली.
मंगळसूत्र तुटल्याने त्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्याने घेऊन पलायन केले. या प्रकरणी पुष्पलता भोर यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या पावसाने दडी मारल्याने नागरिकांची सकाळच्या वेळी रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत दुचाकीवरून येऊन महिलांच्या दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या भुरट्या चोर्‍यांचे प्रकार वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी परिसरात अधिक सतर्कता बाळगावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!