नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव येथे जपानी कंपनी फुकोकू इंडिया प्रा. लि., चाकण यांच्या वतीने २० ऑगस्ट रोजी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीस परिसरातील विविध महाविद्यालयांमधील तब्बल १०७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी २० विद्यार्थ्यांची कंपनीत नोकरीसाठी निवड करण्यात आली. कंपनीचे मानव संसाधन प्रमुख दीपक कुलकर्णी तसेच ऋषिकेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पदवीधर तसेच पदविका धारक विद्यार्थ्यांना या रोजगार संधीमध्ये सहभागी होता आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये रोजगाराची संधी मिळणार असून, स्थानिक युवकांना नामांकित जपानी कंपनीत करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पस मुलाखतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराच्या संधींबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाविद्यालयाच्या वतीने कंपनीच्या प्रतिनिधींचे तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद कुलकर्णी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कॅम्पस मुलाखतीच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन विभागाचे प्रमुख प्रा. दिनेश गाजूलवार, प्रा. अंकुश पिंगळे, प्रा. आकाश कांबळे तसेच सर्व विभागप्रमुखांनी विशेष परिश्रम घेतले.