नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा नारायणगाव बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत जेरबंद केले असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ९२/२०२६ व ९३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये २८ एप्रिल २०२६ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते. फिर्यादी मीरा गणपत शिंदे (वय ४८, रा. बोरी साळवाडी, ता. जुन्नर) या नारायणगाव बसस्थानकातून एसटी बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. तसेच भागवत निवृत्ती घाडगे (वय ७५) यांची दीड तोळे वजनाची सोन्याची चैनही चोरीस गेली होती. या गुन्ह्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी बसस्थानक व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये एक संशयित व्यक्ती आढळून आली. गोपनीय माहितीच्या आधारे हा संशयित बसस्थानक परिसरात चोरी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे नाव अर्जुन कानिफनाथ भोसले (वय २७, रा. धनगर वस्ती, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे असून त्याच्यावर यापूर्वी ४० हून अधिक विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. दरम्यान, ६ जून २०२६ रोजी सदर आरोपी नाशिक फाटा, भोसरी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले एकूण १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शर्मा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि महादेव शेलार, सपोनि प्रवीण सपांगे, पोसई सोमशेखर शेटे, पोसई जगदेव पाटील, सफौजदार दीपक साबळे, पोहवा राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, नंदा कदम, सुजाता कदम, संतोष भापकर, भारत मोहोळ, मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, सुवर्णा गडगे, कविता गेंगजे व टिलेश जाधव यांनी केली.