नारायणगाव पोलीस ठाण्याचा उपक्रम. आदर्श सार्वजनिक गणेश मंडळाला ” गणराया ॲवार्ड 2025″ मिळणार.

नारायणगाव : (प्रतिनिधी )गणेश उत्सव कालावधीत समाज उपयोगी उपक्रम राबवणाऱ्या, समाज प्रबोधन पर देखावे सादर करणाऱ्या, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे व पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करून पारंपारिक वाद्याचा वापर करून, शांततेत, निर्धारित वेळेत विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ” गणराया ॲवार्ड 2025″ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 19 गावात
सुमारे 178 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी बैठक घेतली होती. या वेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नारायणगाव पोलीस ठाण्याची परवानगी घ्यावी,गणेश उत्सव मिरवणुकीत डीजे व लेझर लाईटचा वापर करू नये, नारायणगाव शहरातील विसर्जन मिरवणूक रात्री बारा पूर्वी तर ग्रामीण भागातील सायंकाळी सहा पूर्वी पूर्ण करावी. आदी सूचना देण्यात आल्या होत्या. गणेश उत्सव शांततेत व मंगलमय वातावरणात पार पडावा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे. या उद्देशाने आदर्श गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रथम तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने ” गणराया ॲवार्ड 2025″या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या हस्ते, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. आदर्श गणेश मंडळाची निवड करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन शिक्षक व एक पत्रकार हे तिघे परीक्षक गोपनीय पद्धतीने गणेश मंडळांची पाहणी करणार असून 100 गुणांची गुणपत्रक सूची तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक उपक्रम, समाज प्रबोधन पर देखावे, महिलांची सुरक्षितता, गणेश उत्सवात महिलांचा सहभाग, मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर, निर्धारित वेळेत व शांततेत विसर्जन मिरवणूक, मिरवणुकीत पारंपारिक वाद्याचा वापर, गणेश उत्सव काळात ध्वनी, प्लास्टिक प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न, मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ड्रेस कोड, विसर्जन मिरवणुकीतील सुरक्षा व्यवस्था आदींचा समावेश असणार आहे. रात्री बारानंतर विसर्जन मिरवणूक पुर्ण करणाऱ्या,पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या, मिरवणुकीत शांततेचा भंग करणाऱ्या, मद्य प्राशन, डीजे,लेझर लाईटचा वापर करणाऱ्या मंडळांना या पुरस्कारातून वगळण्यात येणार आहे.
तसेच मागील वर्षी निवड झालेल्या गणेशोत्सव मंडळांना गणराया ॲवार्ड 2024 पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

जाहिरात

error: Content is protected !!