नळावणेच्या वाडी-वस्तीवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई. मागणी करूनही टँकर सुरू होईना.

नळावणे( प्रतिनिधी) नळावणे येथील सुरकुलवाडी, नवलेवाडी व परिसरातील वाडीवस्तीवर पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली असून पंधरा दिवसांपूर्वी जुन्नरचे प्रभारी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांना निवेदन दिले आहे परंतु अद्यापही टँकर सुरू झाले नसल्याचे खंत नळावणे गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांनी व्यक्त केली आहे.

   सरपंच उबाळे म्हणाले की, आमच्या गावठाण हद्दीमध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय नाही तथापि परिसरातील वाडी वस्तीवर जनतेचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. तसेच जनावरांसाठी देखील पाण्याची आता गरज निर्माण होऊ लागली आहे. दूषित पाणी जनावर देखील येत नाहीत. प्रशासनाकडे पाण्याचे टँकर सुरू करा याबाबतची मागणी पंधरा दिवसांपूर्वीच केली. याबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती “विघ्नहर टाइम्स”ने पाहिली आहे व ती परिस्थितीजनतेला दाखवली आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी फोन करून सांगितले  की,सरपंच मॅडम काळजी करू नका लवकरच टँकर सुरू करतो परंतु टँकर मात्र अद्याप सुरू झाला नाही.  प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होतय, अशी खंत व्यक्त करून सरपंच उबाळे म्हणाल्या की,माझी नळवण्याची जनता पाणी मागते आणि मी जर त्यांना पाणी देऊ शकत नसेल तर माझा सरपंच म्हणून उपयोग काय? मी माझ्या जनतेची माफी मागते.. मात्र प्रशासनाने तातडीने दखल घेऊन इकडे पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा अशी त्यांची मागणी आहे.

 नवलेवाडी व सुरकुलवाडी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे.

    लोकांना दूरवरून खाजगी विहिरीवरून पाणी आणावे लागते. रोजगार नसल्यामुळे येथील महिलांना दररोज कुठे ना कुठे कामाला जावे लागते. उशिरा घरी आल्यावर पाण्याची भटकंती करावी लागते आणि भल्या सकाळीच दुसऱ्याच्या विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. सूर्यास्तानंतर व सूर्योदयाच्या अगोदर पाणी आणायला जाणाऱ्या महिलांना बिबट्याची देखील भीती आहे. प्रांत गोविंद शिंदे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी सरपंच अर्चना उबाळे यांनी केली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!