नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्तरीत्या केलेल्या धडक कारवाईत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे कार्यरत असलेल्या दूध भेसळ करणाऱ्या मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंचर हे या संपूर्ण रॅकेटचे प्रमुख केंद्र असल्याचे तपासात समोर आले आहे.
FDA आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सुमारे ३० पोलीस कर्मचारी तसेच FDA चे २० हून अधिक अधिकारी अशा एकूण ५० जणांच्या पथकाने ही गुप्त मोहीम राबवली.
मंचर येथून दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर या रॅकेटची व्याप्ती उघड झाली. त्यानंतर पुणे, सोलापूर (अकलूज), अहिल्यानगर, सांगली, ठाणे (भिवंडी) आणि छत्रपती संभाजीनगर (सिल्लोड) या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. तपासादरम्यान भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, रसायने, यंत्रसामग्री तसेच वाहतूक साधने जप्त करण्यात आली.
या प्रकरणात संशयित म्हणून सुशांत हिंगे (मंचर), हेमंत टेके (अकलूज), संदीप लोढा (मंचर), संजोग यादव (भिवंडी), चेतन भोर (जुन्नर), कैलास लाळगे (शिरूर), कुणाल कुलवडे (जुन्नर), शुभम गिरवले (अहिल्यानगर), सचिन समकाळ (सिल्लोड), वैभव हांडे (जुन्नर), शुभम वाळुंज (मंचर), अभिजित करंडे (राहुरी), रोशन दरेकर (अवसरी-मंचर), राजू सांडभोर (अवसरी-मंचर), प्रमोद घोरपडे (राहुरी), प्रमोद कडू (राहुरी), बापूराव माडे (दौंड), सोनू घोरपडे (सोलापूर), विठ्ठल जाधव (पाबळ), अभिजित काटे (उरुळी कांचन), अभिजीत शेंडवल (जळगाव), आकाश सावंत (जुन्नर), सतीश केंजळे (पाबळ), मनोहर ढमाले (कडूस), ठकसेन अरगडे (पिंपळगाव-मंचर) आणि राजू तांबडे (पिंपळगाव-मंचर) यांची नावे समोर आली आहेत. यापैकी काहींना अटक करण्यात आली असून इतरांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या कारवाईमुळे दूध भेसळीच्या संघटित साखळीचा मोठा भांडाफोड झाला असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुढील तपास FDA आणि पुणे ग्रामीण पोलीस संयुक्तपणे करत आहेत.