लेण्याद्रीतून जनगणनेचा श्रीगणेशा, गिरिजात्मक मंदिरालाचं गणनाघर क्रमांक ०००१…!


नारायणगाव : जनगणना २०२७ च्या घर यादी व घरगणना टप्प्याला गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर एका विलक्षण सुरुवात झाली. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या जुन्नर तालुक्यातील श्री लेण्याद्री गिरिजात्मक गणपती मंदिरापासूनच या राष्ट्रीय कार्याचा श्रीगणेशा झाला असे म्हणावे लागेल. विशेष म्हणजे, जनगणनेच्या नियमाप्रमाणे वायव्य दिशेकडून सुरुवात करताना जनगणना सर्कल 037 मधील घरयादी गट 0244 मधील पहिली इमारत म्हणून गिरिजात्मक मंदिराचीच नोंद झाली. मंदिराला ‘इमारत क्रमांक CN ००१’ तर ‘गणनाघर क्रमांक ०००१’ देण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष विघ्नहर्त्याच्या मंदिरापासूनच जनगणना २०२७ सुरू होण्याचा दुर्मिळ योग जुळून आला. प्रगणक विजय श्रीराम आढे यांनी मंदिराची पहिली नोंद घेतली. घरयादी गटाची सीमा अंतिम करतेवेळी पर्यवेक्षक मोहन नाडेकर देखील उपस्थित होते. “गणपती बाप्पाच्या दारातूनच देशाच्या जनगणनेला सुरुवात होणे हे शुभसंकेत आहेत. ‘सर्व कार्येषू सर्वदा’ या प्रार्थनेप्रमाणे हे कार्य निर्विघ्न पार पडेल”, अशी भावना पर्यवेक्षक व जनगणनेचे जुन्नर तालुका फिल्ड ट्रेनर मोहन नाडेकर यांनी व्यक्त केले. गिरिजात्मकाच्या साक्षीने सुरू झालेली ही जनगणना संपूर्ण देशासाठी मंगलमय ठरेल, असा विश्वास जनगणना समन्वयक अनिल थोरावडे यांनी व्यक्त केला. चौकट जनगणना 2027 च्या घर यादी व घरगणनेसाठी भारताच्या जनगणना आयुक्त कार्यालयाने काही मुख्य नियम ठरवले आहेत. जनगणनेच्या बाबतीत संपूर्ण देशात एकसूत्रता राहावी, कोणतेही घर सुटू नये किंवा दोनदा मोजले जाऊ नये, यासाठी दिशा ठरलेली आहे. *जणगणना नियमाप्रमाणे वायव्य दिशेकडून सुरुवात होऊन आग्नेय दिशेला शेवट होतो.* लेण्याद्रीत वायव्येला साक्षात गिरिजात्मकाचे मंदिर आल्याने पहिली नोंद मंदिराची झाली, हा विशेष योगायोग आहे. नियमानुसार मंदिराला *इमारत क्रमांक CN 001* व *गणनाघर क्रमांक 0001* देण्यात आला. जणगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकाला आपल्या कुटुंबाची माहिती देवून जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ यांनी केले.

जाहिरात

error: Content is protected !!