नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
जुन्नर तालुक्यातील इयत्ता दहावी परीक्षेचा सरासरी निकाल यंदा 95.41 टक्के लागला असून विद्यार्थिनींनी यंदाही गुणवत्तेत बाजी मारली आहे. तालुक्यातील 89 माध्यमिक शाळांमधील 5 हजार 58 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 4 हजार 826 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील तब्बल 24 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून 50 शाळांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक निकालाची नोंद केली आहे.
यंदाच्या निकालात 2 हजार 605 मुलांपैकी 2 हजार 439 मुले उत्तीर्ण झाली असून मुलांचा निकाल 93.62 टक्के लागला. तर 2 हजार 453 मुलींपैकी 2 हजार 387 मुली उत्तीर्ण होत 97.30 टक्के निकालाची नोंद झाली. त्यामुळे विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा सरस कामगिरी केली आहे.
मागील वर्षी तालुक्याचा सरासरी निकाल 96.80 टक्के लागला होता. त्याच्या तुलनेत यंदा 1.39 टक्क्यांनी घट झाली आहे. तालुक्यात एका शाळेचा निकाल शून्य टक्के लागला असून देवळे येथील अजित पवार माध्यमिक शाळेचा सर्वात कमी 60 टक्के निकाल लागला.
दहावी परीक्षेत 1 हजार 399 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून 1 हजार 637 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 1 हजार 343 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 447 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
मागील चार वर्षांचा निकाल
2022 : 97.54 टक्के
2023 : 96.94 टक्के
2024 : 97.52 टक्के
2025 : 96.80 टक्के
2026 : 95.41 टक्के
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा
अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल नारायणगाव, श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज, न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक, विघ्नहर विद्यालय ओझर, शिवनेरी विद्यालय धोलवड, न्यू इंग्लिश स्कूल खामुंडी, आर. बी. देवकर विद्यालय वडगाव आनंद, सावळेरामबुवा दांगट विद्यालय उंब्रज-२, इंदिरा गांधी विद्यालय रानमाळा, येडेश्वर विद्यालय येडगाव, गुरुवर्य गोविंद देव प्रशाला बोरी खुर्द, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव माणिकडोह, ज्ञानदा विद्यालय नारायणगाव, शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाण, ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मंगरूळ, शितोळेश्वर विद्यालय सितेवाडी, कुलस्वामी खंडेराय विद्यालय हिवरे तर्फे नारायणगाव, न्यू इंग्लिश स्कूल हिवरे खुर्द, शिवछत्रपती विद्यालय आळेफाटा, शेठ नानसुख रतनचंद मुथा इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल आळे, शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर, हांडे देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल आळेफाटा व हिरा इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.