नारायणगाव | विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जुन्नर तालुक्यात महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्यात आले असून तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भास्कर गाडगे यांची तालुकाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली आहे. तसेच जुन्नर विधानसभा प्रमुखपदी आनंद रासकर यांना संधी दिली आहे. या दोघांच्या निवडीबद्दल शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
भास्कर गाडगे या सामान्य शिवसैनिकाला तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्याने तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
नियुक्तीबाबत बोलताना गाडगे म्हणाले, पक्षप्रमुखांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीचे भान ठेवून काम करणार असून जुन्नर तालुक्यात शिवसेनेची संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल. “गाव तेथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक” ही संकल्पना राबवून प्रत्येक गावात पक्ष विस्तार केला जाईल. पक्ष अडचणीत असताना साथ सोडणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जुन्नर तालुक्यात शिवसेनेची ताकद प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.