शिवनेर पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल; जप्तीच्या कारवाईचे लेखी आश्वासन.तहसील कार्यालयाच्या पत्रानंतर उपोषण मागे.


नारायणगाव :
जुन्नर येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी संस्थेच्या संचालक मंडळाशी संबंधित मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या ठेवीदारांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे. जुन्नर तहसील कार्यालयाच्या कुळकायदा शाखेने संबंधित मालमत्तांबाबत पुढील महसुली कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने ठेवीदारांनी १७ नोव्हेंबर रोजी सुरू केलेले उपोषण मागे घेतले.
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे यांच्या आदेशानुसार शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासंदर्भात निकाल देण्यात आला होता. या आदेशानुसार संबंधित मालमत्तांचा लिलाव करून आदेशात नमूद केलेली रक्कम व्याजासह वसूल करून मिळावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली होती.
या प्रकरणी प्रदीप गणपत कर्पे, ठकूबाई कर्पे, शांताराम हिंगे, नंदा गांगरे आणि सुनंदा रासकर यांनी तहसील कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई करावी, तसेच ठेवीदारांची नावे इतर अधिकार अभिलेखात नोंदवावीत, अशी त्यांची मागणी होती.
तहसीलदार रणजीत भोसले आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख मंगल गवळी यांनी दिलेल्या लेखी पत्रात महाराष्ट्र जमीन महसूल जमीन वसुलीबाबतचे नियम १९६७ मधील नियम ११ नुसार स्थावर मालमत्ता अटकावून ठेवण्याचे अधिपत्र (वॉरंट ऑफ डिस्ट्रेस) काढून शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावे असलेल्या मालमत्तांबाबत पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच संबंधित गावांतील तलाठी व मंडळ अधिकारी स्तरावर नोटिसा देण्यात आल्याची माहितीही पत्राद्वारे देण्यात आली आहे.
याशिवाय, संबंधित गटांच्या इतर अधिकार अभिलेखात कर्जदारांची नावे दाखल करण्याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडून अहवाल मागविण्यात येणार असून, तो प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून जप्ती व वसुली प्रक्रियेबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ठेवीदारांनी उपोषण मागे घेतले आहे. मात्र, केवळ आश्वासन नको, तर संबंधित मालमत्तांवर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई होऊन ठेवींची रक्कम व्याजासह परत मिळावी, अशी अपेक्षा ठेवीदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून पुढील कार्यवाही कधी केली जाते, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.
फोटो ओळ : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाशी संबंधित मालमत्तांवर जप्ती व वसुलीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी जुन्नर येथे उपोषणास बसलेले ठेवीदार.

जाहिरात

error: Content is protected !!