जुन्नरमध्ये बनावट विदेशी मद्याचा साठा उद्ध्वस्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. एकला ठोकल्या बेड्या रवानगी येरवडा कारागृहात.

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

जुन्नर तालुक्यात बनावट विदेशी मद्याची निर्मिती व साठा करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४ लाख ५४ हजार रुपयांचा बनावट विदेशी मद्यसाठा, चारचाकी वाहन, मोबाईल फोन तसेच मद्य भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुबे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर तसेच पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ३० मे रोजी नारायणगाव विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुन्नर-गणेशखिंड रोडवर सापळा रचण्यात आला होता.

यावेळी जुन्नरकडून गणेशखिंडकडे जाणाऱ्या एमएच-०१ एएक्स-२८८४ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चंदीगड राज्य निर्मित लेबल असलेले बनावट विदेशी मद्य आढळून आले. याप्रकरणी वाहनचालक गोविंद शंकर जाधव (रा. निरगुडे, ता. जुन्नर, जि. पुणे) यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार शिरोली खुर्द येथे छापा टाकण्यात आला. तेथेही मोठ्या प्रमाणावर बनावट विदेशी मद्याचा साठा आढळून आला.

कारवाईदरम्यान इम्पिरियल ब्ल्यू व रॉयल स्टॅग या ब्रँडच्या विविध आकारांच्या बनावट मद्याच्या बाटल्या, एक चारचाकी वाहन, मोबाईल फोन तसेच रिकामे बॉक्स आणि बुचे जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४ लाख ५४ हजार रुपये असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५ (अ), (इ), (डी), (एफ), ८०, ८१, ९० व १०३ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी व त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असून बनावट मद्य भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिकाम्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे, समृद्धी निकम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक दयानंद माने तसेच जवान निलेश केदार, दिलीप केकरे, प्रियंका झांजरे आणि गणेश वाहुळ यांच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.दरम्यान
या प्रकरणाचा पुढील सखोल तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग, नारायणगाव-१ चे दुय्यम निरीक्षक सौरभ आवटे करीत आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!