जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र घड्याळ चिन्हावर लढणार. उद्धव ठाकरेंची शिवसेना असणार सोबत.


विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असून घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तशा प्रकारच्या सूचना उमेदवारांना खासदार अमोल कोल्हे व माजी आमदार अतुल बेनके यांनी उमेदवारांना सुचना दिल्या असल्याचे समजते. माजी आमदार अतुल बेनके यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ व पंचायत समितीच्या 16 जागा आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना व दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चार जिल्हा परिषद जागांचा आग्रह धरल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन जागा देण्याची तयारी दर्शवली जात असल्यामुळे ही चर्चा पुढे सरकत नसल्याचे दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस समोर चार जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. नारायणगाव, बोरी पिंपळवंडी व सावरगाव हे चार गट मागितले असल्याचे समजते. तथापि राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन जागांसाठी ग्रीन सिग्नल मिळाला असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये नारायणगाव व सावरगाव हे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्यास तयार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते शिवसेनेबरोबर युती करावी असाही आग्रह करत असल्याचे समजते आमदार शरद सोनवणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घ्यायला तयार असून तीन गट त्यांना सोडण्यास तयार असल्याची चर्चा होत आहे. तथापि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे वरिष्ठ नेते शिवसेनेबरोबर युती करण्यास सहमत नसल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे या शिवसेनेचे जुन्नर तालुक्यातील एक स्थानिक नेते म्हणाले की एक वेळ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करू परंतु शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करणार नाही. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कमी कालावधी असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून जुळवा जुळवीला वेग आला आहे. बारव या जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागणारे तीनही उमेदवार शिवसेनेच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या सुनबाई माई लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार असल्यामुळे या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुक असलेले तीनही उमेदवार शिवसेना पक्षाकडून उमेदवारी घेणार असल्याचे अंतिम झाल्याचे समजते. दरम्यान आज दिवसभर खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावच्या कार्यालयात माजी आमदार अतुल बेनके, खासदार अमोल कोल्हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर तालुका प्रमुख माऊली खंडागळे, गुलाब पारखे आधी कार्यकर्त्यांची एकत्र बैठक झाली. परंतु बैठकित उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चार जागांची मागणी झाल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा देण्यावर अडून बसल्याने चर्चा पुढे सरकले नाही. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी आमदार शरद सोनवणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात जागा वाटप संदर्भात चर्चा केली होती. यामध्ये तीन गट शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्यास तयार असल्याची चर्चा आहे. तथापि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चार जागा अपेक्षित असल्याने कोणताच निर्णय होऊ शकला नाही.

जाहिरात

error: Content is protected !!