(सुरेश वाणी ) नारायणगाव : जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर पुन्हा वाढला असून, दररोज तालुक्यातील विविध भागांत बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उसाच्या शेतांमध्ये बिबट्यांचा वाढलेला वावर आणि गावालगतच्या वस्त्यांमध्ये होणारे दर्शन यामुळे विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे मुलांना घरापासून शाळेपर्यंत पायी अथवा सायकलवर पाठविण्यास पालक धजावत नसून, अनेक पालक स्वतःच्या दुचाकीवरून मुलांना शाळेत ने-आण करीत आहेत. सध्या जिल्हा परिषद व इतर शाळा सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत भरत आहेत. त्यामुळे सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि दुपारी शाळा सुटल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे घरी आणण्यासाठी पालकांना वेळ द्यावा लागत आहे. शाळेच्या सुटण्याच्या वेळी पालक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून मुलांना सोबत घेऊन घरी जात असल्याचे चित्र अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. उसाच्या शेतांमुळे बिबट्यांना सुरक्षित अधिवास जुन्नर तालुका हा मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो. तालुक्यात सर्वत्र उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यांना दिवसा लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत आहे. त्याचबरोबर शेत परिसरात पाण्याची उपलब्धता आणि कोंबड्या, शेळ्या, कुत्रे यांसारखे पाळीव प्राणी सहज उपलब्ध होत असल्याने बिबट्यांचा वावर मानवी वस्त्यांच्या जवळ वाढत आहे. उसाच्या शेतातून अचानक बिबट्या बाहेर येण्याची शक्यता असल्याने शेतकरी, शेतमजूर तसेच सकाळ-संध्याकाळ शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पायी किंवा सायकलवरून शाळेत जातात. मात्र, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पालकांना मुलांना एकट्याने शाळेत पाठविणे धोकादायक वाटत आहे. मुलांच्या शाळेत जाण्याच्या वेळेत वाढली जोखीम ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची घरे शाळेपासून काही अंतरावर आहेत. पूर्वी ही मुले पायी, सायकलवरून किंवा मित्रांसोबत शाळेत जात होती. मात्र, बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे पालकांनी आता मुलांना एकट्याने बाहेर पाठविणे टाळले आहे. सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत तसेच दुपारी शाळा सुटल्यानंतर शेतरस्त्यांवर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. याच परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने एखाद्या विद्यार्थ्यावर हल्ला होण्याची भीती पालकांना सतावत आहे. त्यामुळे अनेक पालक स्वतः दुचाकीवरून मुलांना शाळेत सोडत असून, शाळा सुटल्यानंतर पुन्हा त्यांना घेण्यासाठी शाळेच्या गेटवर येत आहेत. पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण तालुक्यातील विविध गावांमध्ये बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शेळ्या, कुत्रे, वासरे, कोंबड्या यांसारख्या प्राण्यांना बिबट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिक टाळत आहेत. गावालगत असलेल्या ऊसशेतीत तसेच शेतरस्त्यांवर बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांकडून वन विभागाला माहिती दिली जात आहे. काही ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याची मागणीही ग्रामस्थांकडून केली जात आहे. वन विभागाने शाळांच्या परिसरात जनजागृती करावी बिबट्यांचा वावर असलेल्या गावांमधील शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी वन विभाग आणि शिक्षण विभागाने संयुक्तपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. शाळेच्या परिसरात तसेच विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर बिबट्यांचा वावर असल्यास त्याबाबत पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना तातडीने माहिती देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी एकट्याने शेतातून अथवा निर्जन रस्त्याने जाऊ नये, पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा अथवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये, याबाबत जनजागृती करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना गरजेच्या बिबट्यांचा वावर हा जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागासाठी नवीन विषय नसला, तरी सध्या शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. बिबट्यांचा वारंवार वावर आढळणाऱ्या गावांमध्ये वन विभागाने गस्त वाढवावी, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे लावावेत तसेच नागरिकांना योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वन विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षण भिंत नसल्याने तात्पुरती लोखंडाची जाळी लावण्यात आलेली असते. या कमी उंचीच्या जाळीवरून बिबट्या सहज आत मध्ये उडी मारण्याची भीती असते. या शाळा इमारतीच्या चोहोबाजूंनी ऊस केळी व इतर पिके मोठ मोठी असल्याने बिबट्या अथवा इतर वन्यप्राण्याची भीती नेहमीच असते. विद्यार्थी शाळेत आल्यावर शिक्षकांना त्यांना शिकवण्याबरोबरच त्यांची सुट्टी होईपर्यंत वन्य प्राण्यांपासून विद्यार्थ्यांचे व्यवस्थित संरक्षण होईल याबाबतची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. दरम्यान जुन्नर तालुका बिबट्याचा हॉटस्पॉट असल्याने एक विशेष बाब म्हणून तालुक्यातील अशा शाळांना तातडीने संरक्षण भिंती बांधून देणे गरजेचे आहे. शिक्षकांनी दिवसभर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे द्यायचे की एखादा विद्यार्थी वर्गाच्या बाहेर गेल्यावर त्याच्यावर बिबट्याचा हल्ला तर होणार नाही ना याबाबतची काळजी घ्यायची, असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. @ फोटो – जुन्नर तालुक्यातील येडगावच्या भोरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना घेऊन जाण्यासाठी पालकांची गर्दी. (छाया – सुरेश वाणी )