नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा.
जुन्नर परिसरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८०/२०२६ भा.न्या.सं. ३०३(२) नुसार दि. २९ मार्च २०२६ रोजी परीटवाडी (ता. जुन्नर) येथून शाईन कंपनीची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल होती. तसेच गुन्हा रजिस्टर क्रमांक ११४/२०२६ भा.न्या.सं. ३०३(२) नुसार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी जुन्नर शहरातून बुलेट मोटारसायकल चोरीस गेली होती.
या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान चोरी झालेल्या ठिकाणांजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये चोरी झालेल्या दोन्ही मोटारसायकली ओतूरच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले.
यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ओतूर परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी केली असता, समर्थ बाळासाहेब ढगे (वय १८, रा. ५२ गल्ली, ओतूर, ता. जुन्नर) व अथर्व सचिन साबळे (वय २०, रा. ओतूर, ता. जुन्नर) हे दोघे विनानंबर प्लेटची शाईन मोटारसायकल वापरत असल्याची माहिती मिळाली.
दि. ७ मे २०२६ रोजी हे दोघे कुमशेत फाटा, जुन्नर येथे येणार असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना जुन्नर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदीप वारे तसेच पोलीस शिपाई अक्षय नवले व अभिमन्यू मोटे यांनी केली.