विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
पक्षशिस्तीचा उल्लंघन केल्याच्या कारणावरून जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा रद्दबादल करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असला तरी इतर काही कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मिळालेल्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात काम करीत असल्यामुळे त्यांच्यावर पक्ष कारवाई का करत नाही? एकाला एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय मग हे राष्ट्रवादी काँग्रेसची दुट्टकी भूमिका आहे का अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
पुणे जिल्ह्यातील एका सहकारी संस्थेचे जुन्नर तालुक्यातील एक संचालक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधामध्ये काम करत असल्याची चर्चा संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आहे. पक्षी शिस्त मोडणाऱ्या या सहकारी संस्थेच्या संचालकावर पक्ष कारवाई का करत नाही ? असा सवाल सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षात नाराजी असल्याची चर्चा आहे. केवळ पांडुरंग पवार यांना टार्गेट करून इतरांना मात्र फ्रीहँड दिला जात असेल तर पक्ष कसा वाढणार असाही सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते खाजगीत बोलताना दिसत आहेत.
पक्षाशी असलेली निष्ठा ही केवळ काही निवडक नेत्यांसाठीच मोजली जाणार का, की पक्षशिस्तीचे नियम सर्वांसाठी समान असणार, असा सवाल उपस्थित होत आहे. पक्षाचे नाव, चिन्ह आणि सत्तेची पदे ही सोयीनुसार वापरण्याची मुभा काहींनाच आहे का? की ज्या प्रकारे पांडुरंग पवार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली, तसाच न्याय इतरांनाही लागू होणार आहे?
पक्ष नेतृत्वाकडून याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे. समान न्याय आणि पक्षशिस्त या दोन्ही बाबींची कसोटी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर उभी ठाकली आहे.