*विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा*
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान जुन्नर तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला असला तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 27 जानेवारी हा अखेरचा दिवस आहे. पिंपळवंडी गटात आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात मयूर पवार यांनी दंड थोपटले आहेत. आमदार सोनवणे यांनी मंगेश काकडे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आपल्या पक्षात घेऊन धनुष्यबाणाची उमेदवारी दिली आहे. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मयूर पवार यांची ओळख असताना त्यांना या गटात डावल्याने मयूर पवार यांचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एवढेच नाही तर या मयूर पवार मित्रमंडळींनी आमदार शरद सोनवणे यांच्या पिंपळवंडी गावात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. *आमचा नेता शरददादा* असं यावेळी अनेकांनी भाषणात सांगितले असलं तरी सोनवणे यांनी उभ्या केलेल्या उमेदवाराच्या विरोधात मयूर पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवल्याने सरळ सरळ सरळ सोनवणे यांच्या निर्णयाच्या विरोधात बंड पुकरण्याचे दिसून येत आहे. हे बंड मी सहज थंड करणार असे आमदार शरद सोनवणे यांनी *विघ्नहर टाइम्स* शी बोलताना यापूर्वीच सांगितले आहे. तसे त्यांनी प्रयत्न देखील चालवलेले आहेत. मयूर पवार समर्थक यांना घेऊन ते शनिवारी रायगड या ठिकाणी बसले होते. मयूर पवार समर्थकांना थंड करण्याचा आमदार सोनवणे यांचा प्रयत्न यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. मयूर पवार जर निवडणूकीला उभे राहिले आणि मंगेश काकडे पराभूत झाले तर या पराभवाचे खापर आमदार शरद सोनवणे यांच्या बरोबरच समर्थक कार्यकर्त्यांवर येईल आणि याचा फटका आमदार शरद सोनवणे यांच्या बरोबरच शिवसेनेला बसण्याची भीती असल्यामुळे आमदार शरद सोनवणे एनकेन प्रकारे मयूर पवार यांची माघारी घेण्यासाठी जंग जंग पछाडणार आहेत. मयूर पवार निवडून आले तर ते शरद दादा सोनवणे यांचेच असतील असे पटवण्याचा मयूर पवार समर्थकांकडून प्रयत्न देखील चालू आहे. शरद सोनवणे यांचा मयूर पवार यांच्यावर अधिकच दबाव वाढला तर मयूर पवार समर्थक उमेदवाराला एक दिवस सुरक्षित स्थळी ठेवू देखील शकतात.
मयूर पवार यांचे समर्थक आज जरी सांगत असले की मयूर पवार माघार घेणार नाही. तसेच स्वतः मयूर पवार यांनी देखील पिंपळवंडीच्या मळगंगेची शपथ घेऊन मी निवडणुकीला उभा राहणार आणि विजयी होणारच असे गर्जना केली आहे. परंतु या निष्ठावंतांचे नेते आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या चाणाक्ष स्टाईलने जर या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वी झाले तर मंगेश काकडे यांचा विजय अधिक सोपा होऊ शकतो. मयूर पवार यांनी माघारी घेतली नाही तर मात्र तिरंगी सामना रंगला तरी विजय कुऱ्हाडे यांना या निवडणुकीत चांगला फायदा होऊ शकतो. दरम्यान मयूर पवार यांनी माघारी घेऊ नये असा प्रयत्न विरोधी गटांकडून व इतर पक्षाकडून निश्चित होऊ शकतो..आमदार शरद सोनवणे जर मयूर पवार यांची उमेदवारी मागे घेण्यात यशस्वी झाले तर काकडे विरुद्ध कुऱ्हाडे असा सामना जरी होणार असला तरी या गटात आमदार शरद सोनवणे विरुद्ध माजी आमदार अतुल बेनके अशीच लढत जुन्नर तालुक्याला पाहायला मिळणार आहे.
बोरी खुर्द गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने कल्पना काळे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कल्पना पवार यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पांडुरंग पवार यांना *कन्व्हेन्स* करण्यास माजी आमदार अतुल बेनके व पक्षाचे प्रमुख अजित पवार यशस्वी झाले तर या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय अधिक सोपा व सुखकर होऊ शकतो. व कल्पना काळे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांचा विजय मानला जातो. मात्र पवार व काळे अशी लढत या गटात पाहायला मिळाली तर याचा फायदा शिवसेना पक्ष घेऊ शकतो. पांडुरंग पवार यांच्या सुनबाईंनी माघार घेऊ नये म्हणून शिवसेनेकडून सर्वतोपरी प्रयत्न होऊ शकतात. परंतु पांडुरंग पवार हे पक्ष शिस्तीचे भोक्ते असल्याने व शब्दाला पक्के असल्याने कदाचित अजित पवार आणि अतुल बेनके यांच्या सांगण्यानुसार भविष्यकाळातील जबाबदार शब्द घेऊन माघारी देखील घेऊ शकतात.
बोरी गटातून पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कल्पना पवार माघार घेणार की निवडणुकीच्या स्पर्धेत राहणार तसेच आमदार शरद सोनवणे यांच्या होम पिचवर सोनवणे यांनी दिलेल्या उमेदवाराला शह देण्यासाठी मयूर पवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार की आपण निवडून आणलेल्या आमदारांचा कमीपणा होऊ नये यासाठी बंडखंड होणार याकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष लागले आहे.