नारायणगाव : ( प्रतिनिधी ) दारूची नशा करणे अंगलट आले असून दारू पिण्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकरी दत्तात्रय शिवराम भोर (वय 52) यांचे उपचार सुरू असताना निधन झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.या प्रकरणी दोघांना अटक केली असून जुन्नर न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. मोहन देवराम बोंद्रे, संतोष गोरक्ष शिंदे (दोघेही राहणार हिवरे तर्फे नारायणगाव ता. जुन्नर) यांना नारायणगाव पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार म्हणाले की, आरोपी मोहन बोंद्रे, संतोष शिंदे व दत्तात्रय भोर हे 2 जून 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हिवरे तर्फे नारायणगाव येथील खंडोबा मंदिराजवळ वडाच्या झाडाजवळ दारू पिऊन बसले होते. दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून आरोपींनी दत्तात्रय भोर यांना हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान मोहन बोंद्रे याने दत्तात्रय भोर यांना ढकलून दिल्याने ते सिमेंटच्या पोलवर पडले. यामुळे भोर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना 7 जून रोजी त्यांचे निधन झाले. या प्रकरणी तेजस दत्तात्रय भोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री खुनाच्या गुन्ह्याखाली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे करीत आहे.