नारायणगाव : (प्रतिनिधी )सुमारे चार लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सापडलेले सोन्याचे दागिने दोन मित्रांनी मूळ मालकाला परत केले. या तरुणांच्या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत असून नारायणगाव पोलिसांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या हस्ते तरुण मित्रांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान भाचीच्या लग्नासाठी तयार केलेले मात्र हरवलेले दागिने लग्नापूर्वीच परत मिळाल्याने मेंढपाळाला आत्यानंद झाला. तरुण व नारायणगाव पोलिसांचे मेंढपाळाने आभार मानले आहेत.
गणी मुनिर मोमीन (वय 25, राहणार नारायणगाव- नारायणवाडी ता. जुन्नर), गौरव राजेंद्र हांडे (वय 25, राहणार वारूळवाडी, ता. जुन्नर) हे जिवलग शालेय मित्र असून उच्चशिक्षित आहेत. यापैकी गौरव हांडे याचा हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पुर्ण झाला असून सध्या तो नोकरीच्या शोधात आहे.मित्र गणी मोमीन हा आजारी असल्याने त्याला दवाखान्यात नेण्यासाठी गुरुवारी (ता. 17) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गौरव हा त्याच्या घरी नारायणवाडी येथे आला होता. दवाखान्यात जाण्यासाठी दोघेही मोटर सायकल वर निघाले असता
शेटेमळा येथील गणेश मंदिरा जवळील रस्त्यावर त्यांना पाऊच सापडले. त्यांनी ते उघडले असता त्यामध्ये कर्णफुले व सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले. हे दागिने मूळ मालकाच्या ताब्यात देण्यासाठी त्यांनी शोध मोहीम सुरू केली.पाऊचवर मंचर(ता. आंबेगाव) येथील सराफ बाबूलाल घोडेकर ज्वेलर्स असे नाव व दुकानाचा मोबाईल नंबर होता. त्या नंबर वर त्यांनी संपर्क साधला असता हे दागिने मेंढपाळ देवराम नामदेव झिटे (रा. शिंगवे पारगाव, ता. आंबेगाव) यांनी सात एप्रिल रोजी खरेदी केले असल्याचे व झिटे यांचा मोबाइल नंबर घोडेकर ज्वेलर्स यांनी दिला.गणी व गौरव यांनी त्या नंबर वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याने संपर्क झाला नाही. त्या मुळे त्यांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दागिने सापडल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता ठोंबरे यांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व हवालदार ठोंबरे यांनी मेंढपाळ झिटे यांचा शोध घेतला.खरेदी केलेल्या दागिन्याची पावती घेऊन रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मेंढपाळ झिटे हे नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. पडताळणी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांच्या हस्ते सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मेंढपाळ झिटे यांच्या ताब्यात दिले. हरवलेले दागिने मिळाल्याने मेंढपाळ झिटे यांना गहिवरून आले. त्यांनी गणी, गौरव व नारायणगाव पोलीस ठाण्याचे आभार मानले. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने दोन जिवलग मित्रांचा सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
@महादेव शेलार( सहाय्यक पोलीस निरीक्षक ): नारायणगाव परिसरात मागील पंधरा दिवसात दोन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी झाल्याच्या घटना झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर सापडलेले तब्बल चार तोळे वाजनाचे दागिने नोकरीच्या शोधात असलेल्या दोन जिवलग मित्रांनी परत केले. बदललेल्या सामाजिक परिस्थितीत अशा घटना दुर्मिळ झाल्या आहेत.
@देवराम झिटे(मेंढपाळ): बल्लाळवाडी(ता. जुन्नर)
येथील माझ्या भाचीचे 18 एप्रिल 2025 रोजी लग्न होते. पैसे जमा करून भाचीला लग्नात देण्यासाठी सात एप्रिल रोजी मी दागिने खरेदी केले होते. दागिने घेऊन नारायणगाव मार्गे बल्लाळवाडी येथे मोटरसायकलवर जात असताना दागिन्याचे पाकीट हरवले. मात्र तरुणांच्या प्रामाणिकपणामुळे लग्नापूर्वीच मला दागिने मिळाल्याने भाचीच्या लग्नातील मोठी अडचण दूर झाली आहे.