नारायणगाव : (प्रतिनिधी) जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दररोज कुठे ना कुठे मानवावर हल्ले वाढू लागले आहेत. तसेच पाळीव प्राणी देखील त्याच्या हल्ल्यात बळी गेले आहेत. दिवसेंदिवस बिबट्यांचे दहशत मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. निवेदनात बुचके यांनी नमूद केले आहे की,आजवर जुन्नर तालुक्यामध्ये अनेकांचे बळी बिबट्याच्या हल्ल्यात गेले आहेत. तसेच शेकडो पाळीव प्राणी देखील बिबट्याने ठार केले आहेत. बिबट्याच्या उपद्रवाने जनता त्रस्त झाली असून वनविभागाचे कर्मचारी देखील हातबल झाले आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी उपलब्ध असले तरी पकडलेले बिबटे ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने ती बिबटे वन खाते जवळपास सोडून देतात आणि पुन्हा मानवावर व पाळीव प्राण्यावर हल्ले अधिक वाढतात.यामुळे वनखात्याबद्दल दिवसेंदिवस जनतेचा उद्रेक वाढत चालला असल्याचे या निवेदन यांनी नमूद केले आहे. पकडलेले बिबट्या इतरत्र सोडून देण्यापेक्षा हे बिबटे गुजरात येथील वनतारा येथे देण्यात यावेत.
दरम्यान आशाताई बुचके यांच्या निवेदनानुसार गणेश नाईक यांनी पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना भ्रमणध्वनी करून मुंबई येथील सह्याद्री अतिगृहावर आठ दिवसात बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील खासदार,आमदार, माजी आमदार तसेच महसूल विभाग, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, गट विकास अधिकारी उपस्थित ठेवावे अशा सुचना दिल्या. आशाताई बुचके म्हणाल्या की, वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्याचा विषय गांभीर्याने घेतला असून पुढील आठवड्यात सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर गरज पडली तर वनमंत्री दिल्लीला जाऊन संबंधित मंत्री व अधिकारी यांच्याशी बैठक घेणार आहेत. या बैठकीत केलेल्या उपाय योजनेनंतर जुन्नर तालुक्यात येण्याचे वनमंत्री नाईक यांनी कबूल केले असल्याचे बुचके यांनी सांगितले.
दरम्यान ओतूर येथील वनक्षेत्रपाल जागा अडीच महिन्यापासून रिक्त असून त्या ठिकाणी तातडीने नव्याने वनक्षेत्रपालाची नियुक्ती करावी अशी सूचना व मंत्री महोदयांनी जिल्ह्याचे वनसंरक्षक अशीच ठाकरे यांना दिल्या असल्याचेही बुचके यांनी सांगितले.