नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
आजच्या काळात संपत्ती जमवून ठेवण्यापेक्षा मुलांवर संस्कार होणे गरजेचे आहे. आजचा बालक उद्याचा कुटुंबासाठी व समाजासाठी नेतृत्व करणार आहे. आदर्श कुटुंब व आदर्श समाज निर्मितीसाठी आजचा बालक हा आदर्श असणे महत्त्वाचे आहे. आज पाहिले तर लहान लहान वयातील पाचवी सहावी या वर्गातील मुले व्यसनाधीनतेकडे वळू लागली आहेत.तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. आजच्या स्पर्धेच्या जमान्यात बालका इतकेच पालकांचेही काही बाबतीत प्रबोधन करणे ही गोष्ट गरजेची आहे. बालकांच्या व्यक्तिमत्व विकास होण्याकरता पालकांचीही फार मोठी जबाबदारी असते. तंत्रज्ञानाच्या जमान्यात भौतिक ज्ञानाबरोबर अध्यात्मिक संस्काराची गरज असल्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वारकरी संप्रदायाच्या विचाराने संत वाङ्मयाच्या आधाराने बालकांचे विचार समृद्ध होण्यासाठी 5 मे 2025 ते 21 मे 2025 या कालावधीसाठी मोफत निवासी बाल संस्कार शिबिर महोत्सव श्री स्वामी समर्थ रामदास बाबा देवस्थान ट्रस्ट वडगाव आनंद, समस्त ग्रामस्थ वडगाव आनंद, पादिरवाडी, आळेफाटा व माऊली बाल वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
श्री समर्थ रामदास बाबा देवस्थान ट्रस्ट वडगाव आनंद,पादिरवाडी आळेफाटा( तालुका जुन्नर जिल्हा पुणे )या ठिकाणी बालसंस्कार शिबिर महोत्सव भरवण्यात येणार आहे.
शिबिराचा दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे असणार आहे – पहाटे 5 ते 6 स्नान. सकाळी 6 ते 7 योगासन व्यायाम, 8 ते 9 नाश्ता, 9 ते 10 श्री भगवद्गीता पाठ, 10 ते 11 टाळ पखवाज वादन प्रशिक्षण, सकाळी 11 ते 12 गायन क्लास वारकरी चाली प्रशिक्षण,दुपारी 12 ते 1 भोजन, दुपारी 1 ते 4 पाठांतर व विश्रांती 4 ते 5 विविध खेळ, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 मार्गदर्शन प्रवचन, सायंकाळी 7 ते 8 भजन, रात्री 8 ते 9 भोजन व त्यानंतर विश्रांती. असा दररोजचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा असणार आहे.
शिबिरामध्ये गीत संहिता, व्याख्यान,वारकरी भजनाच्या चाली, हरिपाठ व पाठांतर,कीर्तन,प्रवचन, गायन या विषयावर प्रामुख्याने मार्गदर्शन केले जाणार आहे.
योगाभ्यासक म्हणून हभप तुकाराम महाराज कुरकुटे हे काम पाहणार आहेत. या मोफत निवासी बाल संस्कार शिबिराचा मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.