अडीच वर्षांच्या चिमुकलीने मृत्यूवर मिळवला विजय.नागदंशानंतर विघ्नहर नर्सिंग होममध्ये घडला चमत्कार.


नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीने विषारी नागाच्या दंशानंतर मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत येत जीवनावर पुन्हा हक्क मिळविला. कुटुंबीयांची तत्परता आणि डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा चमत्कार घडून आला.
ही घटना शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे राहत असलेली आर्या योगेश भालेकर ही अडीच वर्षाची चिमुकली आपल्या वडिलांसोबत जमिनीवर झोपली होती. अचानक ती जोरजोरात रडू लागली. कुटुंबीयांनी पाहणी केली असता जवळच एक विषारी नाग आढळून आला. नागाने मुलीच्या उजव्या हाताला दंश केला होता. परिस्थितीचे गांीर्य ओळखून कुटुंबीयांनी तिला तातडीने नारायणगाव येथील विघ्नहर नर्सिंग होममध्ये दाखल केले.
सर्पदंशानंतर अवघ्या ४५ मिनिटांत ती रुग्णालयात पोहोचली. मात्र तेव्हापर्यंत तिची प्रकृती झपाट्याने खालावत गेली होती. तिला गुंगी येऊ लागली, बोलता येईनासे झाले, उलटी झाली आणि तिची अवस्था अत्यंत गंभीर बनली.
रुग्णालयात दाखल होताच ती हृदय व श्वसनक्रिया पूर्णपणे बंद पडलेल्या (कार्डिओरेस्पिरेटरी अरेस्ट) अवस्थेत होती. शरीर थंड पडले होते, नाडी लागत नव्हती, हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते, रक्तदाब मोजता येत नव्हता, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या व स्थिर झाल्या होत्या आणि श्वास पूर्णपणे बंद झाला होता.
क्षणाचाही विलंब न करता डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत यांनी तातडीने सीपीआर सुरू केले. चिमुकलीला इन्शुलेट करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पुढील दीड तासात तिला तब्बल तीन वेळा हृदयविकाराचा झटका आला. प्रत्येक वेळी डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून तिचे हृदय पुन्हा सुरू करण्यात यश मिळवले.
या जीवन-मृत्यूच्या लढाईत डॉ. ऋचा मते, डॉ. अजय मते, डॉ. योगेश पाटील तसेच विघ्नहर नर्सिंग होममधील परिचारिका व सर्व कर्मचाऱ्यांनीही मोलाची भूमिका बजावली. आपत्कालीन उपचार, कृत्रिम श्वसन आणि इतर अतिदक्षता उपचारांसोबत अवघ्या २० ते ३० मिनिटांत ३० अँटी-स्नेक व्हेनम (एएसव्ही) इंजेक्शन्स देण्यात आली.
सायंकाळपर्यंत आशेचा पहिला किरण दिसू लागला. चिमुकलीच्या पापण्यांची आणि जिभेची हालचाल सुरू झाली. विषाचा प्रभाव कमी होत असल्याचे हे पहिले सकारात्मक लक्षण होते.
अवघ्या २४ तासांत तिची प्रकृती आश्चर्यकारकरित्या सुधारली. तिला पूर्ण शुद्ध आली, तिने चारही हातपाय हलवण्यास सुरुवात केली आणि तिला यशस्वीरित्या व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले.
सध्या तिची प्रकृती स्थिर असून ती वेगाने बरी होत आहे. मात्र उलटीमुळे फुफ्फुसात अन्न व द्रव गेल्याने झालेल्या अॅस्पिरेशन न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. तसेच दंश झालेल्या हाताची सूज कोपरापर्यंत वाढली असून त्यावरही उपचार सुरू आहेत. तिची न्यूरोलॉजिकल सुधारणा अत्यंत समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महत्त्वाचे संदेश
सर्पदंशानंतर वेळ न दवडता तातडीने रुग्णालयात पोहोचणे हेच जीव वाचवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे.
योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात अँटी-स्नेक व्हेनम, कृत्रिम श्वसन व अतिदक्षता उपचार दिल्यास अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णही पूर्णपणे बरे होऊ शकतात.
अनुभवी डॉक्टरांचे नेतृत्व, वैद्यकीय पथकाचे समन्वित प्रयत्न आणि शेवटच्या क्षणापर्यंत न हार मानण्याची जिद्द यामुळे अशक्य वाटणारेही शक्य होते.
अडीच वर्षांच्या या चिमुकलीची जीवनासाठीची झुंज आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे मिळालेला हा विजय ग्रामीण भागातही उच्च दर्जाचे सर्पदंश उपचार आणि अतिदक्षता सेवा उपलब्ध असल्याचे प्रभावी उदाहरण ठरला आहे. हा केवळ एका मुलीचा जीव वाचल्याचा प्रसंग नसून, वेळेवर उपचार, योग्य निर्णय आणि समर्पित वैद्यकीय सेवेमुळे मृत्यूवरही मात करता येते याचा जिवंत पुरावा आहे.

जाहिरात

error: Content is protected !!