ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; २३ गुन्हे उघडकीस.

विघ्नहर टाइम्स वृतसेवा : विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत २३ गुन्हे उघडकीस आले असून १३७ किलो वजनाच्या तांब्याच्या पट्ट्या व तारा तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण ८ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण वाढल्याने अनेक गुन्हे दाखल झाले होते. या चोरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत होते. तसेच परिसरात अंधार निर्माण झाल्याने इतर गुन्ह्यांची शक्यता वाढत होती. ट्रान्सफॉर्मर बहुतेक दुर्गम भागात असल्याने प्रत्यक्ष साक्षीदार किंवा सीसीटीव्ही अभावी तपास करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकाची बैठक घेऊन २०२५ व २०२६ मधील गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यानुसार जुन्नर-खेड उपविभागातील अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. गुन्ह्यांची ठिकाणे, वेळ आणि कार्यपद्धती यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.
तपासादरम्यान घटनास्थळांच्या आसपासच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे ही टोळी तळेगाव ढमढे परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
१७ मार्च २०२६ रोजी मांजरवाडी रोड, पुणे-नाशिक बायपास परिसरातून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ट्रान्सफॉर्मर चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यासाठी वापरलेल्या इर्टिगा व अल्टो या दोन चारचाकी वाहने तसेच चोरी केलेल्या तांब्याच्या पट्ट्या व तारा जप्त करण्यात आल्या.
तपासात आरोपींविरुद्ध पुणे ग्रामीण व अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

जाहिरात

error: Content is protected !!