नारायणगाव,: विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील धरण क्षेत्रांमध्ये अतिक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जलसंपदा विभागाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार बळावत असल्याचे चित्र समोर येत आहे. पिंपळगाव जोगा धरण, माणिकडोह धरण तसेच येडगाव धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे. धरणाच्या कालव्यांवर आणि पोटचाऱ्यावर काही ठिकाणी कांदा साठवणुकीसाठी बऱाकी उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, काही भागांमध्ये पोटचाऱ्या पूर्णपणे बुजवून त्या जागांवर शेती करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे जलव्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी तर या पोटचाऱ्या गाडून ती जा घरासाठी वापरली असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हा प्रकार नवीन नसून गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने वाढत आहे. मात्र, संबंधित जलसंपदा विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाडस वाढत आहे. वडज धरणाच्या कालव्यावर एका ठिकाणी पत्र्याचे शेड बांधण्याचे निदर्शनात येत आहे. अतिक्रमण करणारे आणि जल संपदा विभागातील काही अधिकारी यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही केला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “अतिक्रमणाबाबत माहिती घेतली जाईल. आढळल्यास संबंधितांना नोटीस देण्यात येईल,” अशी प्रतिक्रिया देण्यात आली. मात्र, ही उत्तरे केवळ औपचारिक असल्याची भावना नागरिकांमध्ये असून ठोस अंमलबजावणीची मागणी होत आहे. दरम्यान, धरण क्षेत्रातील अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाह, साठवण क्षमता आणि सिंचन व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात गंभीर परिणाम टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, तसेच अतिक्रमणाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे.