नारायणगाव : कांदळी (१४ नंबर), ता. जुन्नर, जि. पुणे येथील ग्रामस्थ तसेच नारायणगाव पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने नगदवाडी (ता. जुन्नर) येथील संचिता फुड्स या आस्थापनावर मंगळवारी ( दि. 28) पहाटे सुमारे २ वाजता धडक कारवाई केली. या कारवाईत कुल्फीचे उत्पादन अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत सुरू असल्याचे, तसेच त्याच शेडमध्ये फिनेल, लिक्विड फ्लोअर क्लीनर आणि इतर रासायनिक पदार्थांचे उत्पादन व विक्री केली जात असल्याचे उघड झाले. अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत, स्वाती मस्के, लक्ष्मीकांत सावळे आणि अभिजित झोडगे यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार अन्नपदार्थांचे उत्पादन हे रासायनिक पदार्थांच्या उत्पादनापासून पूर्णपणे वेगळ्या, सुरक्षित व स्वच्छ ठिकाणी करणे बंधनकारक असताना संबंधित आस्थापनात या मूलभूत निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आढळले. कारवाईदरम्यान मलाई कुल्फीचे दोन नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच उर्वरित ४७.८५ किलो मलाई कुल्फीचा ₹19,140 किमतीचा साठा मानवी आरोग्यास संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ नष्ट करण्यात आला. या गंभीर अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापनाचे अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत मंजूर करण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) संजय चट्टे तसेच सहआयुक्त (पुणे विभाग) दिगंबर भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अस्वच्छ किंवा संशयास्पद परिस्थितीत अन्नपदार्थांचे उत्पादन अथवा विक्री होत असल्याची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी आवश्यक ती त्वरित कारवाई करता येईल. दरम्यान गेल्या दोन महिन्यापासून सबंधित इसम 14 नंबर या ठिकाणी गोडाऊन मध्ये रात्रीच्या वेळेस आईस्क्रीम बनवत होता दिवसभर हे गोडाऊन बंद राहायचे व रात्रीच्या वेळेला गोडाऊन सुरू राहायचे या गोडाऊन मध्ये नेमकं काय चालतोय याबाबतची शंका स्थानिक नागरिकांना आल्यानंतर त्यांनी या संदर्भात आवाज उठवला. स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व स्थानिक नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन यांना कळविल्यानंतर पहाटे दोन वाजता कारवाई करण्यात आली.