उसाच्या शेतात सुमारे १५ लाखांचा गांजा जप्त.दोन पोती गांजा पोलिसांच्या ताब्यात; गांजा नेमका आला कुठून❓

नारायणगाव :

नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांदळी गावात उसाच्या शेतामध्ये सुमारे ३२ किलो गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत १५ लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. १५) रात्री उशिरापर्यंत नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदळी गावच्या हद्दीतील राहुल दत्तू गाडगे यांच्या उसाच्या शेतात दोन पोती आढळून आली असल्याचे समजते . याबाबत कांदळीचे पोलीस पाटील अरुण भालेराव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पथक पाठविले. संबंधित ठिकाणी पंचनामा करून दोन्ही पोती ताब्यात घेण्यात आली असून, ती नारायणगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.

गांजा शेतात आणून कोणी ठेवला?

उसाच्या शेतात आढळून आलेला गांजा नेमका कुठून आणण्यात आला? तो शेतात कोणी ठेवला? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करून गांजाच्या साठ्यामागील व्यक्तींचा शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील अधिकृत तपशील समजू शकला नाही.

जाहिरात

error: Content is protected !!