बोरी- आळे रस्त्याची दुर्दशा. ठेकेदार रस्त्याचे काम पूर्ण करणार कधी?

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा  बोरी – आळे हा रस्ता पूर्णपणे खराब झालो असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम त्वरित करून घ्यावे अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गणेश औटी यांनी दिला आहे.    बोरी कडून व अळ्याहून बोरीला परिसरातील लोकांना दररोज ये-जा करावे लागते,परंतु गेल्या वर्ष भरापासून हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे दूध गवळी व शाळकरी मुलांचा रस्त्याने ये जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतातल्या मालाची वाहतूक करताना देखील शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.अनेकदा खड्ड्यामध्ये आपटून दुचाकी वाहनाचे अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. तसेच दुचाकी व चार चाकी वाहनांचे नुकसान देखील झाले आहे.     रस्त्याला खूप खड्डे पडल्याने पावसाळ्यामध्ये या खड्ड्यामध्ये पाणी साचून अनेक वेळा अपघात झाले होते. रस्त्याचे काम तातडीने करण्यात येईल असे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले होते. पावसाळा उघडून पाच महिने उलटले तरी अद्याप रस्त्याच्या कामाचा मुहूर्त संबंधित विभागाला आणि ठेकेदाराला सापडत नसल्याबद्दल प्रवासीही तीव्र संताप व्यक्त करत आहेत.     दरम्यान ज्या ठेकेदारांनी हे काम घेतले आहे त्या ठेकेदाराचे अगोदरच्या कामाचे बिल अद्याप न मिळाल्यामुळे व्यक्तिगत खिशातल्या पैशातून ठेकेदार रस्त्याचे काम करू शकत नसल्यामुळे या कामाला विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जुन्नर तालुक्यातील ठेकेदारांची येणे रक्कम काही कोटींमध्ये असून शासनाकडे बिल पाठवली आहेत परंतु तिजोरीत खडखडाड असल्याने ठेकेदारांना पैसे मिळत नाहीत.    स्थानिक नागरिकांच्या आक्रोश्यामुळे चार दिवसापूर्वी ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे परंतु पुढे पाठ आणि मागे सपाट अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. अतिशय कासव गतीने काम सुरू केले असून प्रत्यक्षात पूर्ण क्षमतेने कामाला सुरुवात व्हायला पंधरा दिवस ते तीन आठवडे लागतील असे ठेकेदाराच्या वतीने सुपरवायझर कडून सांगण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम तातडीने सुरू करून लवकर पूर्ण करावे व या परिसरातील जनतेची व शेतकऱ्यांची दूर करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करावे लागेल असा इशारा बोरी परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

जाहिरात

error: Content is protected !!