*विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा*
जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील कोरडे मळा येथे राजेंद्र सिताराम कोरडे यांच्या घरी रविवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास जबरी चोरी करून दहा ते बारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. आठ ते दहा चोरटे असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून बाजूच्या घराचे दरवाजे या चोरट्यांनी बंद करून कोरडे यांच्या घराच्या दरवाजावर दगड टाकले. महिलांचे व लहान मुलांचे दागिने ह्या चोरट्यांनी पळवले आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना वाढू लागल्याने पोलिसांना आता अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान ग्रामीण भागामध्ये चोऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढू लागले असून पोलिसांबरोबरच स्थानिक नागरिकांनी देखील गस्त घालण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व चोरट्यांचा माग शोधण्याचे काम सुरू केले आहे.